आषाढी एकादशीनिमित्त विश्वासराव रणसिंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भक्तिमय दिंडी सोहळा.
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग इंग्लिश मिडीयम स्कूल, कळंब (वालचंदनगर) ता. इंदापूर येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढत वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा अनुभवली.
दिंडीमध्ये सहभागी झालेल्या बालचमूंनी "ज्ञानोबा-तुकाराम", "माऊली-माऊली"च्या जयघोषासह अभंग, भजनांचे सुमधुर गायन केले. तसेच "माऊली माऊली" या गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पालखी सोहळा ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, सेवा, शिस्त, भक्ती आणि सामाजिक ऐक्याची शिकवण देणारी संस्कृती आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो आणि चांगल्या संस्कारांची जपणूक होते.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, मिस. अश्विनी घुगरी, मिस. सुजाता निंबाळकर, मिस. प्राजक्ता अर्जुन तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी  उपस्थित होते. संपूर्ण दिंडी सोहळा भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात संपन्न झाला.