shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बालवारकऱ्यांच्या उत्साही पालखी दिंडीने शाळा परिसर भक्तिमय

बालवारकऱ्यांच्या उत्साही पालखी दिंडीने शाळा परिसर भक्तिमय
काळेवाडी (ता. इंदापूर): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ व अंगणवाडी काळेवाडी नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून बालवारकऱ्यांची पालखी दिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी पूजन व पालखी पूजनाने करण्यात आली. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" अशा जयघोषांसह गावातून पालखी दिंडी काढली. दिंडीदरम्यान गावातील पालकांनी व ग्रामस्थांनी पालखीचे पूजन करून बालवारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होत आनंद व्यक्त केला.
दिंडी पूर्ण झाल्यानंतर सर्व बालवारकऱ्यांना प्रेमपूर्वक पोहे, जिलेबी व बिस्किटांचा पौष्टिक नाश्ता देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या पालखी दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, संस्कार, शिस्त, सामाजिक एकात्मता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली. पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रताप शिरसट , उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे  अंगणवाडी सेविका संगीता चव्हाण , मदतनीस मीरा नायकवाडी , शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
close