इंदापूर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यकर्त्यांकडून सर्वाधिक प्रेम मिळालेल्या लोकप्रिय नेत्यांपैकी अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजरामर झाले.प्रशासन चालविण्याचा हातखंडा असणारे अजित पवार हे तरूणाईच्या गळ्यातील ताईत होते.पोटात तेच ओठात असणारे स्वर्गीय अजितदादा हे सार्वजनिक जीवनातील एक दुर्मिळ नेते होऊन गेले.विमान दुर्घटनेत अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू होऊन आज जवळपास सहा महिने झाले तरी त्यांच्या जाण्याची सल अजूनही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,प्रवक्ते संदेश देवकर,उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,आण्णासाहेब धोत्रे,सचिन खामगळ,सुहास बुटे,रमेश शिंदे,दादासाहेब भोसले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे म्हणाले की,अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही.कार्यकर्त्यांवर खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करणारा नेता म्हणजे अजितदादा होते,त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असुन दादांचे विचार,त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खऱ्या अर्थाने अजित दादांना श्रद्धांजली ठरेल.असे म्हणत हनुमंत कोकाटे यांनी अजित पवारांच्या कार्याला ऊजाळा दिला.

