उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड; विखे-थोरात एकजुटीचा सहकार क्षेत्रात नवा अध्याय!
शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा : अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांची गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून परस्परविरोधी भूमिका घेणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत सहकार विकास मंडळाची स्थापना केली. या राजकीय समीकरणातून विखे-थोरात यांची सहमती एक्स्प्रेस यशस्वी ठरली. संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी या पॅनलने १७ जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.
गुरुवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी डॉ. सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी रणजितसिंह देशमुख यांचेच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या समर्थक संचालकांनीही पाठिंबा दिल्याने विखे-थोरात गटाची ताकद अधिक वाढली. निवडीनंतर विखे आणि थोरात समर्थकांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे मोठे आव्हान!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दूध संस्था, महिला बचत गट आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. पीककर्ज, शेतीसाठी भांडवल, सहकारी संस्थांना आर्थिक मदत आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना देण्यामध्ये या बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यामुळे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासमोर शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, कर्जवाटपातील पारदर्शकता, थकबाकीचे प्रश्न, आर्थिक शिस्त आणि बँकेच्या आर्थिक स्थितीला अधिक बळकटी देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकारासाठी एकत्र येण्याचा संदेश!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात यांची एकजूट आणि राम शिंदे समर्थकांचा पाठिंबा या राजकीय घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. मात्र, या राजकीय एकजुटीचे खरे यश शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यातूनच सिद्ध होणार आहे.
नव्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सहकाराच्या नव्या पर्वाला सुरुवात; आता अपेक्षा शेतकऱ्यांच्या विकासाची!

