shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

सावरगाव तळच्या विकासकामांचा तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडून गौरव!

ग्रामविकास, जलसंधारण, दुग्धव्यवसाय आणि सेंद्रिय शेतीतील प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक – तहसीलदारांचे गौरवोद्गार

संगमनेर : संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी शिष्टमंडळासह सावरगाव तळ येथे भेट देऊन गावाने ग्रामविकास, समान पाणी वाटप योजना, जलसंधारण, आदर्श दुग्धव्यवसाय, शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सावरगाव तळ येथील शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून उभे केलेले विकासाचे मॉडेल निश्चितच प्रेरणादायी असून राज्यासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार तहसीलदार धीरज मांजरे यांनी यावेळी काढले.

या दौऱ्यात तहसीलदार मांजरे यांनी बाळासाहेब यादव नेहे यांच्या BRC (सेंद्रिय निविष्ठा निर्मिती) केंद्राला भेट दिली. शेतीमध्ये रासायनिक औषधांचा वाढता वापर लक्षात घेता सेंद्रिय औषधे व निविष्ठा निर्मितीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे, गावातील अत्यल्प भूधारक शेतकरी गोरक्षनाथ राधाकिसन थिटमे यांचा दुग्धव्यवसाय पाहून शिष्टमंडळातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. अवघी १० गुंठे जमीन असतानाही त्यांनी ३० गायींच्या माध्यमातून दररोज साधारण ४०० लिटरपेक्षा अधिक दूध उत्पादन घेण्याचा आदर्श निर्माण केला आहे. मर्यादित जमीन आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून यशस्वी दुग्धव्यवसाय कसा उभारता येतो, याचे हेb उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

गावाने २०१९ मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविलेल्या जलसंधारणाच्या कामांचीही शिष्टमंडळाने पाहणी केली. तसेच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून तब्बल १२ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनद्वारे आणलेली पाणी योजना, समान पाणी वाटपाची व्यवस्था आणि सामूहिक नियोजनातून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

याशिवाय शेतीमधील नावीन्यपूर्ण पीक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून मिळणारे विक्रमी उत्पादन यांचीही पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास पाणीटंचाई, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतीतील आर्थिक अडचणींवर मात करता येते, हे सावरगाव तळने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

ग्रामविकासापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत विविध क्षेत्रांत सामूहिक सहभाग, नियोजन आणि कष्टाच्या बळावर सावरगाव तळने निर्माण केलेला आदर्श इतर गावांसाठीही प्रेरणादायी आहे. या गावाने शेती, जलसंधारण, दुग्धव्यवसाय आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेले काम निश्चितच अनुकरणीय असल्याची भावना तहसीलदारांसह शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली.

यावेळी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे, संगमनेर महाविद्यालयाचे प्रबंधक संतोष फापाळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नेहे, दूध संस्थेचे संचालक संदीप थिटमे, संदीप गुंजाळ, संदीप येंधे, राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे, भीमाशंकर नेहे, वाटर संस्थेचे अजित फापाळे, राहुल फापाळे, ॲड. संदीप नलावडे यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

सावरगाव तळचा हा विकासप्रवास म्हणजे केवळ एका गावाची यशोगाथा नसून सामूहिक इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाचा प्रेरणादायी वस्तुपाठ आहे.
close