सायबर गुन्हे, अमली पदार्थ, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे!
इंदापूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनिमित्त विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन; ऊस वाहतूक, महिला सुरक्षा, भाडेकरू पडताळणी आणि वाहतूक व्यवस्थेवर दिले विशेष निर्देश
इंदापूर : प्रतिनिधी
बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत असून सायबर फसवणूक, आर्थिक गुन्हे, अमली पदार्थांची विक्री, अवैध दारूविक्री, महिला व मुलींची सुरक्षितता तसेच रस्ते अपघात यांसारखी आव्हाने पोलिसांसमोर उभी राहत आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ पोलीस यंत्रणेवर अवलंबून न राहता पोलीस, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, ग्रामस्थ आणि सजग नागरिक यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, इंदापूर पोलीस निरीक्षक विलास नाळे, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, विरोधी पक्ष नेते अनिल पवार तसेच इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलीस पाटील, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक तपासणीच्या माध्यमातून कामकाजाचा आढावा
पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून वर्षभरातील कामकाज, गुन्हेगारी परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्यामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांचा आढावा घेण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. या तपासणीच्या माध्यमातून त्रुटी दूर करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षेसाठी भरोसा सेलचा आधार घ्या
महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार, पतीचे व्यसन, घरातील सततचे वाद आणि महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत महिला दक्षता समितीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मा यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
अशा समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि भरोसा सेलशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्ती व्यसनाधीन असल्यास कुटुंबीयांच्या सहकार्याने पुनर्वसन केंद्राची मदत घेण्याचा प्रयत्न करावा. व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन प्रक्रियेत कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
अवैध दारूविक्री आणि अमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाई
गावागावांमध्ये अवैध दारूविक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई करावी. तसेच तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
गावांमध्ये गांजा किंवा इतर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना किंवा नियंत्रण कक्षाला द्यावी. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल. व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करून पुनर्वसन केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे शर्मा यांनी सांगितले.
ऊस वाहतुकीबाबत साखर कारखान्यांना थेट सूचना
सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असल्याने इंदापूर तालुक्यात ऊस वाहतुकीच्या वाहनांची संख्या वाढली आहे. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रक यांच्यामुळे महामार्गावर तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
परिसरातील सर्व साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन ऊस वाहतूकदारांना वाहतुकीचे नियम समजावून सांगावेत. वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, विरुद्ध दिशेने वाहतूक न करणे आणि सुरक्षित वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक करण्यासाठी जनजागृती करावी. सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
भाडेकरू आणि कामगारांची पोलीस पडताळणी करा
इंदापूर परिसरात हॉटेल, लॉज, ढाबे, व्यावसायिक आस्थापना तसेच भाड्याने घरे देण्याचे प्रमाण वाढत आहे. बाहेरून येणारे कामगार, नोकर आणि भाडेकरू यांची योग्य माहिती उपलब्ध असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
घरमालक, हॉटेल व्यावसायिक आणि आस्थापनांच्या मालकांनी भाडेकरू व कामगारांची पोलीस पडताळणी करून घ्यावी. यासाठी जनजागृती करणारे पोस्टर आणि बॅनर तयार करून हॉटेल, लॉज आणि सार्वजनिक ठिकाणी लावावेत. नागरिकांनीही या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्याचे आवाहन
सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी ही मोठी समस्या बनली आहे. अनोळखी व्यक्तींकडून फोन करून भीती दाखविणे, पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल करणे, बनावट गुंतवणूक योजनांचे आमिष दाखविणे, लिंक पाठवून आर्थिक माहिती मिळविणे अशा विविध पद्धतींनी नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
अनोळखी फोन कॉल आणि संशयास्पद लिंकपासून नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. कमी कालावधीत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचे आमिष दाखविणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्हेगार संघटित पद्धतीने काम करीत असून नागरिकांच्या सोशल मीडिया खात्यांवरील माहितीचा अभ्यास करून फसवणुकीचे जाळे तयार करतात. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शाळा-महाविद्यालयांत जनजागृतीवर भर
महिला सुरक्षा, वाहतूक नियम, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्हे याविषयी शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यार्थ्यांना योग्य वयात मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यातील अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
पोलीस पाटील आणि ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची
गावातील प्रत्येक घडामोडीची माहिती स्थानिक पातळीवर सर्वप्रथम पोलीस पाटील आणि सजग नागरिकांना मिळू शकते. त्यामुळे गावांमध्ये होणाऱ्या बैठका, ग्रामसभा आणि जनजागृती कार्यक्रमांतून सायबर फसवणूक, अवैध दारूविक्री, अमली पदार्थ, व्यसनाधीनता आणि महिला सुरक्षेबाबत सातत्याने प्रबोधन करावे. संशयास्पद घटना घडल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शर्मा यांनी केले.
इंदापूर पोलिसांच्या कामकाजाचा आढावा
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी इंदापूर तालुक्याची भौगोलिक, सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेची पार्श्वभूमी स्पष्ट केली. नीरा व भीमा नद्यांचा परिसर, उजनी धरणाचे बॅकवॉटर, भिगवण येथील फ्लेमिंगो पक्षी, नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र, पुणे-सोलापूर महामार्ग आणि आषाढी वारीतील इंदापूरचा रिंगण सोहळा यामुळे या भागाला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील धार्मिक कार्यक्रम, गणेशोत्सव, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्था यांसारख्या विविध बाबींचा विचार करून इंदापूर पोलीस ठाण्याला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनीही इंदापूर पोलिसांच्या गणेशोत्सव, मिरवणूक, आंदोलन व्यवस्थापन, अपघातग्रस्तांना मदत आणि महिला सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. निर्भया पथक, पोलीस दीदी, पोलीस दादा आणि शाळा-महाविद्यालयांतील समुपदेशन उपक्रमांमुळे महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे महिलांना भेडसावणाऱ्या कौटुंबिक समस्यांवर अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
सुरक्षित इंदापूरसाठी पोलीस आणि समाजाचा समन्वय आवश्यक
बदलत्या सामाजिक परिस्थितीत निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणेने आधुनिक पद्धतीने काम करण्याबरोबरच नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य केले, तर गुन्हेगारी रोखणे, महिला व मुलींची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि सामाजिक शांतता राखणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल, असा संदेश या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने देण्यात आला.

