नेवासा : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे, अन्यायाविरुद्ध संघर्षाची भूमिका घेणारे आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणारे युवा शेतकरी नेते त्रिंबकराव पाटील भदगले यांची उस्थळ दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सर्व संचालकांच्या एकमताने निवड करण्यात आली आहे.
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे भदगले यांची ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक व शेतकरी चळवळीतील कार्याची पावती मानली जात आहे.
शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा दिवंगत नेते स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे. आंदोलन, उपोषण, बंद, हरताळ तसेच विविध आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करून त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधले आहे. एवढेच नव्हे, तर न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या संघर्षशील नेतृत्वाची दखल घेत माजी आमदार संभाजीराव पाटील फाटके यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच शेतकऱ्यांनी भदगले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सहकाराच्या माध्यमातून शेतकरी हिताचा नवा अध्याय!
चेअरमनपद ही केवळ पदाची जबाबदारी नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाची आणि अपेक्षांची मोठी जबाबदारी आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणे आणि संस्थेचा कारभार पारदर्शकपणे पुढे नेणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे कसब असते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व आता सहकाराच्या व्यासपीठावर कार्यरत होणार असल्याने उस्थळ दुमाला परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या निवडीबाबत समाधान व्यक्त होत आहे.
संघर्षातून नेतृत्व आणि नेतृत्वातून शेतकरी हिताचा ध्यास, अशी ओळख निर्माण केलेल्या त्रिंबकराव भदगले यांच्या पुढील वाटचालीस शेतकरी वर्गातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

