श्रीरामपूर | प्रतिनिधी |
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायती आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे ऑफलाईन झाल्या आहेत. त्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष श्री.श्रीराम फरगडे, उपाध्यक्ष श्री.प्रशांत थोरात ,सचिव श्री.किसन इंगळे यांच्यासह तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे वतीने श्री.कणगे साहेब , तालुका समन्वयक श्री.किरण भालदंड यांना दिले.
महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील ग्रामपंचायत ,पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणक परीचालाकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देवून किमान वेतनाची तरतूद करावी.तसेच आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधीचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या CSC-SPV या कंपनीसह तिच्या उपकंपन्यावर कायदेशीर कारवाई करणे व त्या कंपनीस या प्रकल्पाच्या कामासाठी मुदतवाढ देवू नये आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.सिद्धेश्वर मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती ,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून शेकडो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. शासनाची कर्जमाफी, पीकविमा आदी सर्व शासकीय योजना संगणक परीचालाकांमार्फत राबविल्या जातात. तसेच ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत दफ्तर ऑनलाईन करणे.दाखले देणे आदी कामे संगणक परिचालक करतात. महाराष्ट्र डिजिटल करण्याचे काम हे संगणक परिचालक करतात.परंतु त्यांचाच शासन विचार करत नाही. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा हा संघर्ष मागील पाच वर्षापासून चालू आहे विविध आंदोलने झाली. नागपूर येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला होता परंतु तरीही महाराष्ट्रातील संगणक परीचालकानी आंदोलन चालू ठेवले होते. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केलेले आहे.
याप्रसंगी सुनील कचरे ,अभिजित थोरात, सादिक शेख , संदीप धीवर , सुधीर तुपे, किरण चक्रनारायण , सुनील गोर्डे, राहुल म्हस्के, वर्मा, सीमा दातरंगे , कातोरे अपर्णा , सगळे वर्षा, मनीषा पिंपळे राजेश कुहिले, जयश्री गडकरी, भारत वारुळे, दवंगे , जाकीर पटेल आदी संगणक परिचालक मोठ्या संख्येने हजर होते.

