shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शिरुर लोकसभा मतदारसंघात धान्य किट्स वाटपाला सुरुवात


 पिंपरी-चिंचवड, पुणे: ( ‘कोरोनाची साखळी तोडू, माणुसकीची साखळी जोडू’ या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘जगदंब प्रतिष्ठान’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून शिरुर लोकसभा मतदारसंघात धान्य किट्स वाटपाला आज सुरुवात झाली. जुन्नर तालुक्यातील ६०० कुटुंबांना धान्य किट्सचे वाटप आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार डॉ.अमोल कोल्हे


कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर, रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘कोरोनाची साखळी तोडू, माणुसकीची साखळी जोडू’ हे अभियान राबविले आहे. ‘जगदंब प्रतिष्ठान’या आपल्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात ६०० तर खेड तालुक्यातील ५०० कुटुंबांना धान्य किट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पाच किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो तूरडाळ, एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, एक किलो मीठ आणि मसाले असे या धान्य किट्सचे स्वरुप आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातही यापूर्वी ७०० धान्य किट्स वाटण्यात आली असून रोज सकाळ-संध्याकाळ मिळून एक हजार गरीब व गरजू नागरिकांना जेवण पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत १६५०० व्यक्तींना अन्न पाकिटे वाटण्यात आली आहेत. कुठल्या तालुक्यात किट्सची संख्या किती हे महत्त्वाचे नसून प्रत्येक ठिकाणच्या गरजेनुसार गरीबांना धान्य पुरवण्याचा खासदार डॉ. कोल्हे यांच्या’जगदंब प्रतिष्ठान’चा प्रयत्न असून शिरूर-हवेली, आंबेगाव तालुक्यातही धान्य किट्सचे वाटप केले जाणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात आज प्रातिनिधिक स्वरूपात धान्य किट्स वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी श्री. सागर कोल्हे, आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दानशूर व्यक्ती व कंपन्यांना मदतीचे आवाहन करून ‘कोरोनाची साखळी तोडू, माणुसकीची साखळी जोडू’ अशी साद घातली होती. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी यामुळे बळ मिळत असल्याची भावना खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
close