shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाॅकडाऊनमुळे कोकणातील जगप्रसिद्ध रानमेव्याल मोठा फटका - शेतकरी आर्थिक संकटात शेतकर्यांना शासनाच्या मदतीची गरज

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) 
कोकण म्हटले म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवागार निसर्ग, गर्द वनराई अथांग निळा महासागर, स्वच्छ समुद्र किनारा, नारळी फोफळीच्या आणि आंबा काजूच्या बागा त्याच प्रमाणें डोंगरची मैना अर्थात करवंद, जांभळे, फणस, कलिंगड आणि भाजीपाल्याचे मळेे वनौषधी इत्यादींच्या नैसर्गिक खजिन्याने समृद्ध असलेल्या कोकणात देशासह संपूर्ण जगभरातील पर्यटकांना स्वर्गसुखाची अनुभूती येते. उपरोक्त नैसर्गिक खजिन्यावर कोकणातील शेतकर्यांचा उदरनिर्वाह आणि अर्थार्जन अवलंबून असते. मात्र या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगासह भारतात लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे कोकणातील जगप्रसिद्ध रानमेव्याच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. लाॅकडाऊन मुळे कोकणातील हा तयार झालेला सर्वप्रिय रानमेवा कुठे आणि कधी विकायचा हा प्रश्न कोकणातील तमाम  शेतकर्यांना अहोरात्र भेडसावत आहे. 



कोकणातील सर्व शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात, बागेत प्रचंड मेहनत घेऊन भात, नाचणी, वरी, कडधान्य आणि त्याच बरोबर आपल्या बागेतून आंबा, काजू, ओल्या काजूचे गर, फणस, पेरू, कोकम, चिंच, नारळ, सुपारी, जांभळ, करवंद, पालेभाज्या, वांगी, मिरची, भेंडी, गवार, पडवळ, घेवडा आणि कलिंगड इत्यादींचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन प्रत्येक शेतकरी आपल्या वार्षिक कौटुंबिक उदरनिर्वाह आणि अर्थार्जनाची व्यवस्था करून ठेवतो. आणि समाजात ताठ मानेने जगतो. 

या वर्षी जगासह संपूर्ण देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची संक्रमण साखळी रोखण्यासाठी व कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासाठी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी शासनाने मेडीकल, दवाखाने व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी केवळ आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंतच उघडी ठेवली जातात. या अत्याल्प तीन ते चार तासांमध्ये कोकणातील सर्व शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री स्थानिक बाजारपेठेत कशी करणार असा प्रश्न कोकणातील सर्व आंबा, काजू बागायतदारांना पडला आहे. 

देशातील लाॅकडाऊन मुळे सर्व ठिकाणच्या स्थानिक बाजारपेठा जवळ जवळ कोरोना मुळे ओस पडल्या आहेत. त्यामुळे आपल्या शेतात, बागेत यावर्षी कोकणचा रानमेवा भरपूर प्रमाणात झाडाला लागला आहे. मात्र लाॅकडाऊन संचारबंदी मुळे सर्व ठिकाणच्या बाजारपेठा सकाळी निर्धारित वेळेतच उघड्या असल्याने कोकणातील शेतकर्यांना आपल्या बागेतील, शेतातील रानमेवा बाजारात दिवसभर बसून विकता येत नाही. या शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. या सर्व कारणांमुळे कोकणातील जगप्रसिद्ध रानमेव्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे कोकणातील सर्व शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आला आहे. या सर्व बाबींचा शासनाने गांभीर्याने विचार करून कोकणातील शेतकर्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला पाहिजे. अशी कोकणातील तमाम शेतकर्यांची अपेक्षा आहे.
close