सावळीविहीर ।राजकुमार गडकरी।
कोरोना चा मुकाबला करण्यासाठी सर्व देशभर, राज्यात लॉकडाऊन आहे, शिर्डीतही लॉक डाऊन असून सर्व बंद आहे, मात्र काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असतात त्यासाठी आता शिर्डीतही लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाच्या ठिकाणी व गर्दी होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रथमच ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येतअसून नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जात आहे.
सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे ,सर्व बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ठप्प आहे , कोणालाही विनाकारण शहरात संचार करायला बंदी आहे असे असतानाही काही लोक नियम तोडून फिरत असतात अशांवर यापूर्वीही अनेकदा नजर ठेवण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे. मात्र नजर चुकवून असे काही लोक फिरत असतातच, उगाच काहीतरी बोगस कारण सांगून इकडून तिकडे फिरत असतात किंवा किराणा दूध भाजीपाला, मेडीकल घेण्यासाठी अशा दुकानात सोशल डिस्टेंस न पाळता गर्दी करतात.
विनाकारण कोणतीही दक्षता न घेता व नियम न पाळता गर्दी करत असतात. अनेकदा पोलीस आहे तोपर्यंत सर्व नियम पाळले जातात परंतु पोलीस व्हॅन निघून जाताच परत जैसे थी परिस्थिती तेथे होत असते. यावर आता नियंत्रण मिळवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दीपक गंधले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत खाजगी ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येत आहे.
शिर्डीतील साईश कॉर्नर, कालिकानगर, श्रीराम नगर ,बस स्टॅन्ड, नगर मनमाड महामार्ग अशा गजबजलेल्या ठिकाणी व भाजीपाला मार्केट अशा ठिकाणी ड्रोन द्वारे कॅमेऱ्याने वरून पाहणी होत असून जर कोणी लॉकडॉऊन काळात नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसल्यास अशा लोकांवर कडक कारवाई होत आहे.
जेथे गर्दी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आता शिर्डीत ड्रोन द्वारे प्रथमच निरीक्षण केले जात आहे.यापूर्वीही शिर्डीत पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत नगर मनमाड रस्ता व इतर रस्त्यांवर नाकाबंदी करून ठिक ठिकाणी बॅरिकेड्स लावून टारगट तरुणांच्या वर कारवाई केली, मोटरसायकली जप्त केल्या मात्र शिर्डीतील काही ठिकाणी पोलीस व्हॅन निघून गेल्यानंतर परत लोक किराणा, दूध ,भाजीपाला, मेडिकल घेण्याचे कारण दाखवून उगाच फिरत असतात, अश्या नियम तोडणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर आता शिर्डीत ड्रोन कॅमेरा द्वारे नजर ठेवली जात आहे व नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. तरी या काळात सर्वांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये आपापल्या घरात सुरक्षित राहावे असे आवाहन शिर्डी पोलीसांनी केले आहे.
शिर्डी प्रमाणेच शिर्डी परिसरातही या अशा टारगट तरुणांचा उपद्रव वाढला आहे. रात्री मोटरसायकलवर इकडून तिकडे फिरताना आसपासच्या गावांमध्ये ते दिसतात या काळात सर्वत्र बंद असल्यामुळे व शिर्डीत कडक बंदोबस्त असल्यामुळे शिर्डीतील व शिर्डी परिसरातील टारगट शिर्डी परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये विनाकारण फिरत असतात. शिर्डी परिसरात आता रात्रीच्या भुरट्या चोर्या वाढल्या आहेतअशांवर पोलिसांनी नजर ठेवणे महत्त्वाचे आहे.


