shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टाटा समुहाचे भारत देशासाठी सर्वोच्च योगदान काय आहे ते पहा ...



 काय आहे टाटा संस्कृती

        कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये सरकारला टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स च्या माध्यमातून 1500 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाच्या बातम्या सगळीकडे पसरत असतानाच गिरीश कुबेर लिखित टाटायन हे पुस्तक वाचनाच्या शेवटच्या टप्प्यावर आले होते. आजच्या टाटांच्या या निर्णयावर समाजमाध्यमांत कौतुक होत आहे परंतु मागे वळून पाहिले तर  देशाच्या अडचणीच्या प्रत्येक टप्यावर आणि देशाला जेंव्हा जेंव्हा गरज आहे त्यावेळी टाटा समूहाने पुढाकार घेतला आहे.
     आजचा भारत जो काही औद्योगिक प्रगती करत आहे त्याचे मूळ टाटा समूहातच आहे. मग ते भारतातील पहिला पोलाद कारखाना टाटा स्टील पासून ते अगदी आत्ताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पर्यंत.  उंचावर कृत्रिम धरण बांधून पाणी साठवून त्या पाण्यापासून वीज निर्माण करणारा जगातील पहिला वीज प्रकल्प ही टाटा यांनी वळवण येथे उभारला आणि मुंबईला अखंडित वीज पुरवठा केला.




        भारतीय विज्ञान संशोधनात आणि शिक्षणात आजही अनन्यसाधारण महत्व असणारी संस्था. डॉ. होमी भाभा यांच्यापासून ते विक्रम साराभाई यांच्यापर्यंत विज्ञान क्षेत्रात सोनेरी कामगिरी करणारे सगळेच जण या संस्थेशी कधीना कधी निगडित होते. अशी भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute Of Science) ही संस्था 1909 ला स्थापन झाली ती जमशेटजी टाटा यांच्या पुढाकाराने त्यासाठी त्यांनी मुंबईतील 14 इमारती व भूखंड विकून या संस्थेसाठी निधी उभा केला. 
       भारतात ऑलिम्पिक चळवळीची मुहूर्तमेढ दोराबजी टाटा यांनी रोवली. 1920, 1924 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूचा खर्च त्यांनी स्वतः केला. 
      टाटांनी कर्क रोगावरील उपचारांसाठी टाटा मेमोरियल हे रुग्णालय  सुरू केले. मुंबईतील तरुण हुशार डॉक्टरांना त्यावेळी टाटांच्या खर्चाने परदेशात कर्करोगाच्या उपचारपद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात असे. रुग्णालयात गरिबांसाठी 75% खाटा राखीव ठेवल्या होत्या त्याचा खर्च टाटांतर्फे केला जायचा.
       "समाजसेवा म्हणजे काय, हे सुद्धा नीट सांगितले गेले पाहिजे समाजसेवेचे एक विज्ञान आहे ते विकसीत झाले पाहिजे" भारत स्वतंत्र झाल्यावर मदत लागणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असेल. यासाठी सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसिएल सायन्स (TISS) ही संस्था 1936 साली स्थापन झाली. त्यासाठी सर दोराबजी ट्रस्ट मधून देणगी दिली. 
      आधुनिक भारतासाठीची पहिली स्वदेशी विमान कंपनी सुरू करण्याचे श्रेय JRD टाटा याना जातं. Air India ही टाटांच्या मालकीची विमान कंपनी राष्ट्रीयीकरणा नंतर  सरकारच्या मालकीची झाली. 
     ज्या काळात विमा हा शब्द देखील जनतेला माहीत नव्हता त्या काळात 1919 ला टाटांनी न्यू इंडिया अशुरन्स ही विमा कंपनी काढली त्याचे ही नंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि ती सरकाच्या मालकीची बनली. 
     सर दोराबाजी टाटा यांचे बंधू सर रतन टाटा यांनी मोहेंजेदरो आणि हडप्पा इथल्या उत्खननासाठी तसेच पाटलीपुत्र इथल्या उत्खननासाठी निधी दिला आणि सिंधू व सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या लपलेल्या खुणा पृथ्वीच्या पोटातून बाहेर आल्या ते टाटा  यांच्यामुळेच... तसेच गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाज आणि महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील कामाला देणगी ही या टाटानीच दिली.
      दुसरं महायुद्ध सुरू असल्याने होमी भाभा याना परदेशात जाता येत नव्हतं. तेंव्हा भारतात अडकून पडलेल्या होमी भाभा यांना जेआरडी म्हणाले "परदेशात तू जे काय करणार आहेस, ते करणारी संस्था इथेच का नाही काढत?" त्यासाठी टाटांनी "टाटा मूलभूत संशोधन संस्था" (TIFR) संस्था स्वतःच्या पैशातून स्थापन केली आणि ती होमी भाभा यांच्याकडे सोपविली. या संस्थेच मूल्य इतकं की मुंबईजवळ सरकारचे अनुऊर्जा केंद्र स्थापन झाले त्यावेळी भाभा यांच्या मदतीला जे 45 अभियंते होते ते याच संस्थेमध्ये तयार झालेले.   
      भारतातून दोन महिला डॉक्टर स्त्रीरोग शस्त्राच्या उच्च अभ्यासासाठी पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये गेल्या त्या जमशेटजींनी केलेल्या मदतीमुळे नंतरच्या 100 वर्षांत जे. एन. टाटा इंडोव्हमेंट पाट्यावृत्तीवर दोन हजारांवर अधिक विद्यार्थ्यांना उचशिक्षित होता आलं.
     गेली 150 वर्ष एखादा उद्योग समूह देशामध्ये टिकून राहतो देशातच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव आणि दर्जा टिकवून ठेवतो हे जागतिक पातळीवरील एकमेव उदाहरण आहे. 
        भारताच्या दृष्टीकोनातून पाहू गेल्यास अन्य जागतिक उद्योगसमूह आणि टाटा यांच्यातील एक फरक अत्यंत महत्वाचा आहे टाटा समूहातल्या प्रत्येक कंपनीचा जन्म हा समाजाला काय हवं या जाणिवेतून झाला आहे. त्यांनी आर्थिक प्रगती तर केलीच, पण ती समाजाच्या प्रगतीला पुढं करून. म्हणून तर म्हटलं जातं की भारतामध्ये टाटा एकटेच उद्योजक आहेत बाकी सगळे व्यापारीच... हे सर्व करत असताना त्यांना काही कमी अडचणी आल्या नाहीत. ज्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कसा मार्ग काढला आणि बरच काही सांगणारे पुस्तक..!
भारतातील प्रत्येक उद्यमशील तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींनी वाचावे असे पुस्तक "टाटायन"
लेखक - गिरीश कुबेर.
close