पिंपरी-चिंचवड, पुणे:
पिंपरी चिंचवड शहरातील रूपीनगर तळवडे मध्ये कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी बारामती पॅटर्न राबविण्याची गरज आहे. शहरात ज्या-ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. तिथे प्रथम प्राधान्याने ‘बारामती पॅटर्न’ राबवून कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. आज (मंगळवारी) निगडी-रुपीनगर येथील नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे रुपीनगर हॉटस्पॉट झाला असून आजपर्यंत परिसरात २६ रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकार तसेच मनपा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक कर्फ्यू लॉकडाऊन, कम्प्लिट लॉकडाउन, कर्फ्यू लागू झाल्यानंतरही कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वारंवार सांगूनही रूपीनगर मधील काही अतिउत्साही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूपीनगरमध्ये बारामती पॅटर्न राबविण्यात येणे गरजेचे आहे. या पॅटर्न नुसार ज्या भागात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे तिथे कर्फ्यू लावून सीमा सील करण्यात येऊन लॉकडाउन काटेकोरपणे पार पाडले पाहिजे. आणि घरोघरी स्क्रिनिंग करण्यात यावे अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास शहरातील कोरोनाला वेळीच रोखण्यात यश येईल. शहरात ज्या – ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. तिथे प्रथम प्राधान्याने बारामती पॅटर्न अवलंबून कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.


