अहमदनगर दि.12-
कोव्हीड 19 चाचणी अहवाल नकारात्मक आलेल्या तसेच नॉन कोव्हीड संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी व ग्रामपातळीवर संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीच्या अनुषंगाने विविध मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
कोव्हीड-19 चाचणी करण्यात आलेल्या व्यक्तीसाठी -
ज्या रुग्णांची कोव्हीड 19 चाचणी अहवाल नकारात्मक आलेला आहे व ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा कमी असून त्यांना इतर कोणताही आजार ( मधुमेह, उच्च रक्तदाब,हृदयाचा आजार इत्यादी) नाही, त्यांना 14 दिवसासाठी घरातच (Home quarantine) विलगीकरण करण्यात यावे.
ज्या रुग्णांची कोव्हीड 19 चाचणी अहवाल नकारात्मक आलेला आहे व ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांना इतर आजार ( मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचा आजार इत्यादी) आहे. त्यांना 10 दिवस तालुकास्तरावरील संस्थेत संस्थात्मक विलगीकरण(Institutional quarantine) करावे व त्यानंतर 7 दिवस घरातच विलगीकरण करण्यात यावे.
नॉन कोव्हीड संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी-
योग्य पी.पी.ई किट वापरत असलेल्या आरोग्य कर्मचा-यांना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता नाही. अति जोखमीच्या आरोग्य कर्मचा-यांसाठी 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण, घरात विलगीकरण, निश्चित केलेले विलगीकरण केंद्र या ठिकाणी ठेवण्यात यावे. तसेच 5 व्या व 12 व्या दिवशी त्यांचे नमुने तपासणीकामी पाठविण्यात यावेत. तपासणी अहवाल नकारात्मक आल्यास सदर कर्मचारी 15 व्या दिवशी कामावर रुजू होऊ शकतील. कमी जोखीम संपर्कात असलेल्या आरोग्य कर्मचा-यांचे घरी विलगीकरण करावे. त्यांचे लक्षणांची नियमित तपासणी करण्यात यावी.
बाहेरुन तालुकास्तरावर वास्तव्यास आलेल्या व्यक्तीसाठी -
बाहेरुन तालुकास्तरावर वास्तव्यास आलेल्या व्यक्तीचे 10 दिवस तालुकास्तरावर संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. व त्यानंतर हातावर शिक्का मारुन 7 दिवसासाठी घरात विलगीकरण करण्यात यावे.
तालुकास्तरावरील घरात विलगीकरण असलेल्या व्यक्तींची त्या घरीच विलगीकरणात राहतील याची जबाबदारी संबंधीत स्थानिक प्राधिकरणाची असेल. सदर व्यक्तींची आरोग्य विषयक तपासणी आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत करुन घेण्यात यावी.
बाहेरुन गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तीसाठी -
बाहेरुन गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तीना गावात आल्यानंतर ग्रामसुरक्षा समितीमार्फत ठरविण्यात आलेलया संस्थेत 10 दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे व त्यानंतर हातावर शिक्का मारुन 7 दिवसासाठी घरात विलगीकरण करण्यात यावे.
घरात विलगीकरण असलेल्या व्यक्तींची आरोग्य विषयक तपासणी आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत करुन घेण्यात यावी. विलगीकरण करण्यात आलेल्या सर्व व्यक्तीना त्यांचे मोबाईलवर आरोगय सेतू अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणे बंधनकारक राहील.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.


