shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुम्हीच ठरवा काय हवे - आरोग्यधाम की अमरधाम

व्यसनांना बाजुला ठेवून करा योगा व प्राणायाम
कोरोनाच्या महामारीने मानवी जीवन, व्यवहार आणि वर्तनात फार मोठे बदल घडवून आणले आहेत. तीन महिन्यापूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल की महामारीच्या लॉकडाऊनमुळे दोन महिने घरात बसावे लागेल. मागील 100 वर्षात कधीच न अनुभवलेल्या भयानक संकटाने मानव जातीला अनेक धडे शिकविले आहे. मनमानी आहार, व्यायामाचा अभाव, व्यसनांचा प्रभाव आणि कुसंस्कारांचा दबाव यामुळे आधुनिक जीवनपध्दती जगत असताना माणूस निसर्गाला विसरला. निसर्गशक्ती सर्वशक्तीमान असल्याने कोरोना विषाणूच्या भयानक संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीगत व सामूहिक स्वच्छता, योग्य आहार व प्रतिकार क्षमता यासाठी निसर्गाचा फार मोठा आधार मानवजातीस आहे. आधुनिकतेच्या नावाखाली वाढते प्रदूषण, दुषीत अन्न, पाणी यामुळे सुखाचा वर्षाव होत असताना अनारोग्य वाढल्याने सुखानंद घेणेही अवघड झाले आहे. कोरोना महामारीने गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष, सर्व जाती धर्माचे लोक एका पातळीवर आणले आहे. कोरोना व्हायरस हे बघत नाही. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये सर्व जाती धर्माचे, स्त्री-पुरुष व गरीब श्रीमंत सारख्याच खाटांवर औषधोपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स व कर्मचारी हे देवदूत म्हणून सर्व धर्म समभावाने काम करीत आहे. मानवाच्या ठायी असलेला अहंकार कोरोना संकटाने गळून पडला आहे. 



आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या दि. 10 मे 2020 अखेर 22171 एवढी असून मृत्यूंची संख्या 832 आहे. 4200 एवढे कोरोनाबाधीत बरे होऊन घरी गेलेले आहेत. असे असले तरी या भयानक संकटाचे गांभीर्य काही व्यक्तींना कळत नाही. अनेक सबबी सांगून घराबाहेर बीनकामाचे फिरणार्‍यांनी फार मोठा धोका निर्माण केला आहे. सरकार व शासन यंत्रणा रात्रंदिवस शिस्तीसाठी, वैद्यकीय उपचारासाठी व नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असून लग्नासाठी, अंत्यविधीसाठी, भाजीपाला घेण्यासाठी, दारु घेण्यासाठी होणारी गर्दी अतिशय भयानक संकटाची घंटा आहे. कोरोनाचे संकटाचा आलेख वाढत असताना अडचणींचे डोंगरही उभे राहत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अत्यंत हाल झाले ते मजूरवर्गाचे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी रहायचे कोठे? खायचे काय? उपचारादरम्यान कुटूंबाची अवस्था या सर्व गोष्टी अतिशय दु:खदायक आहेत. कोणत्याही कारणाने शहरातील, खेड्यातील एखादी व्यक्ती कोरोना बाधीत म्हणून तपासणीसाठी शासकीय यंत्रणेने नेली तर संबंधीत कुटूंब भीतीच्या प्रचंड दडपणाखाली येते. शेजारचे रहीवासी असहकार पुकारतात. तपासण्यासाठी कोरोनाबाधीत व्यक्ती मृत्यू पावली तर घरच्यांना दर्शनसुध्दा होत नाही. सरकार परस्पर अंत्यविधी करते. आपली व कुटूंबाची फार दक्षतेने काळजी घेणे गरजेचे असल्याने केवळ बेफिकीरी म्हणून कुणी बेशिस्त वागत असेल तर त्यामुळे त्याला, त्याच्या कुटूंबाला त्रास होईलच त्याचबरोबर आसपासचा परिसरही सील केला जातो. संचारबंदीमुळे जगजीवन अत्यंत अडचणीचे होते. म्हणून प्रत्येक नागरिकाने शहरात असो की खेड्यात स्वतःची व कुटूंबाची फार काळजी घेऊन सुरक्षीत रहाणे सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहे. 

शासनाने संचारबंदी जाहीर केली असतानाही हजारो नागरीक भाजीपाला खरेदीसाठी, किराणा खरेदीसाठी आणि औषधोपचारासाठी बाहेर पडताना अजिबात शिस्त पाळत नाही. फिजिकल डिस्टंसची काळजी घेत नसल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन कालावधी आणखी वाढत आहे. अनेक परिसर सील होत असल्याने नाकाबंदी होत आहे. नागरिक बेशिस्त वागत असतील तर त्याचा तणाव पोलीस व आरोग्य यंत्रणेवर फार मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वात चिंताजनक व वाईट बाब म्हणजे दारुविक्रीची परवानगी देताच अतिशय विकृत चित्र बघायला मिळाले. दारु दुकानांच्यापुढे एक किलोमीटरपर्यंत दारुखरेदीसाठी रांगा बघून, तेथील गर्दी बघून अत्यंत दुःख झाले. कोरोनासारख्या भयानक संकटात मृत्यूशी सामना करणारे लाखो लोक तडफडत असताना दारुची हौस भागविण्यासाठी हजारोंची धडपड बघीतली की वाटते व्यसनी लोकांना प्राणापेक्षाही व्यसनाचा विळखा आवडतो. ही अतिशय भयानक बाब आहे. त्यामुळे सरकारने एका दिवसात दारुविक्री बंद केली.  लॉकडाऊनच्या काळात आरोग्यविषयक अनेक बाबी प्रकर्षाने जाणवू लागल्या. लाखो परप्रांतीय मजूर व गरीब लोक यांच्या जेवणाचे व आरोग्याचे प्रश्‍न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. सरकारी यंत्रणेने अनेक ठिकाणी त्यांची खाण्याची, राहण्याची सोय करण्याचे नियोजन केले. अनेक सेवाभावी संस्था व व्यक्तींनी अन्नदानाचे फार मोठे सामाजिक कार्य या संकटप्रसंगी केले. त्यामुळे भूकबळी झाले नाहीत. परप्रांतीय मजूरांच्या भावना लक्षात न घेतल्याने त्यांनी मिळेल त्या साधनाने अथवा पायी प्रवास सुरु केला. जालण्याजवळ झालेला रेल्वे अपघात किंवा ट्रक अपघातात बळी गेलेले मजूर ही फार मोठी दुर्घटना आहेत. परिस्थितीनुरुप कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी, अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक संस्था व व्यक्ती सातत्याने प्रयत्नशील असले तरी बेशिस्त वागणार्‍या नागरीकांचा प्रश्‍न भयानक स्वरुपात समोर येत आहे. 

कोरोना संकटावर मात करण्यासाठी कुटूंबात सुरक्षीत रहाणे, योग्य व ताजा आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी या बाबी महत्वाच्या आहेत. विशेषतः नियमीत प्राणायम अत्यंत गरजेचा असताना नागरीक व्यायामाचा कंटाळा करतात. व्यसनांसाठी कासावीस होतात. दारु तंबाखू, गुटका महागड्या दराने खरेदी करतात. त्यामुळे जीवन अडचणीत येत असल्याचे माहीत असूनही केवळ परिस्थितीचे गांभीर्य नसल्याने अनेकजण कोरोना झाल्याने अमरधाममध्ये जात आहेत. एक अमरधाममध्ये गेला तर बाकीचे कुटूंब असहाय, दुःखी व इतरांच्या द्वेेषाला पात्र होते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी, सामाजिक व सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रयत्न केल्यास आनंदाचे आरोग्यधाम मिळू शकते. म्हणून प्रत्येक नागरिकाने आता स्वतःच ठरवावे आपणास आरोग्यधाम हवे की अमरधाम. चुकीचे व बेशिस्त वागून अमरधामला जावू नका.

- किसन भाऊ हासे, संस्थापक
दैनिक युवावार्ता, संगमनेर
9822039460
close