अहमदनगर, दि. 1 जून - जिल्हा माहिती कार्यालयातील दुरमुद्रणचालक सुधीर मा. पवार 31 मे 2020 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्र. जिल्हा् माहिती अधिकारी दीपक चव्हाण म्हणाले की, माहिती व जनसंपर्क विभागात सु.मा.पवार यांनी 34 वर्ष सेवा केली आहे. मनमिळावू स्वभावाने श्री. पवार यांनी माणसे जोडण्याचे काम केले. सतत हसतमुख आणि कार्यमग्न राहून त्यांनी सेवा बजावली. कार्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. इतर सहकाऱ्यांना मदत करत स्वतःची जबाबदारी तितक्याच समर्थपणे श्री. पवार यांनी सांभाळली. सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या स्वभावामुळे त्यांची यापुढील वाटचालही अधिक आनंददायी असेल, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वसाधारण सहायक संतोष गुजर, लिपिक नि टंकलेखक सुरज लचके, वाहनचालक अरुण सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री पवार यांनी भावपूर्ण होत सर्वांच्या सहकार्यामुळेच सेवेचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, अशी भावना व्यक्त केली. आपल्या ३४ वर्ष सेवेच्या कालावधीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी आणि इतर सहकारी यांनी कायम सहकार्य केल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या पत्नी मेघा पवार व मुलगा तन्मय पवार उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष गुजर यांनी केले. यावेळी कार्यालयातील सहकारी सुरज लचके, अरूण सोनवणे आदी उपस्थित होते.


