बृहन्मुंबई महानगरपालिका
जनसंपर्क विभाग
वार्तापत्र, दि. १४ जून २०२०
> महापालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात 'त्रिशतकी' ट्याहां*
>३०० व्या कोविड बाधित मातेची सुखरुप प्रसूती; बाळ - बाळंतीण सुखरुप
>प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभाग या तीन विभागांच्या सुयोग्य समन्वयातून साधले शुभ वर्तमान..!!
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात 'कोरोना कोविड १९' बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा काल रात्री ओलांडून कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. तर आज सकाळ पर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. तेव्हापासून गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोविड बाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे. कालच तान्हुल्यांच्या टॅ्याह्यांच्या मंगलस्वरांनी देखील त्रिशतकी टप्पा ओलांडला असून बाळांची संख्या आज सकाळ पर्यंत ३०६ झाली आहे; अशी माहिती नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डाॅक्टर सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे समन्वयक (Nodal Officer for Covid Maternity) प्रा. डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे. *उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात ३०० कोविड बाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.
मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील *डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे गेल्या दोन महिन्यांपासून घरी न जाता रुग्णालयात राहूनच अथकपणे काम करीत आहेत*.
..
गेले दोन महिने सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सिस्टर सीमा चव्हाण, सिस्टर रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
..
यानिमित्ताने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी तिन्ही विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. तर कोविड विषयक समन्वयक डॉक्टर सारिका पाटील आणि डॉक्टर सुरभी राठी यांनीही तिन्ही विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
...
*कोविड बाधित १० तान्हुल्यांचीही कोविड वर मात*
👇
कोविडच्या अनुषंगाने माहिती देताना डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितले की, कोविडचा संसर्ग हा जन्मतः होत नाही. पोटात असणा-या बाळाच्या आईला जरी कोविडचा संसर्ग असेल, तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय उपचार क्रमानुसार (मेडिकल प्रोटोकॉल) कोविड बाधित मातेपासून जन्मलेल्या नवजात शिशुंची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी केली जाते. यानुसार गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या ३०६ तान्हुल्यांपैकी १० नवजात शिशुची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तथापि, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. तसेच 'डिस्चार्ज' देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी 'निगेटिव्ह' आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
...
*६३ टक्के 'नाॅर्मल डिलिव्हरी', तर ३७ टक्के 'सिझेरियन'. 'सिझेरियन डिलिव्हरी' योग्यप्रकारे होण्यात भूलशास्त्र विभागाचे मोलाचे योगदान*
👇
नायर रुग्णालयात कोविड बाधित मातांच्या २ महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ३०२ प्रसूतिंपैकी १८९ प्रसूती म्हणजेच ६३% या 'नॉर्मल डिलिव्हरी' प्रकारातील होत्या. तर उर्वरित ११३ अर्थात ३७% या 'सिझेरियन डिलीवरी' प्रकारातील होत्या. 'सिजेरियन डिलीवरी' प्रकारातील प्रसूती सुखरूपपणे होण्यात नायर रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाची (Anesthesia Dept.) अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. प्रसूती झालेल्या ३०२ मातांपैकी २५४ मातांना 'डिस्चार्ज' देण्यात आला आहे.
...
*स्वच्छता आणि साफसफाई*
👇
प्रसूतिशास्त्र विभाग आणि नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) दोन्ही विभागातील स्वच्छता आणि साफसफाई अतिशय चांगल्या प्रकारे व नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी या दोन्ही विभागातील वॉर्डबॉय व कामगारांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडत आहेत. अंगावर 'पीपीई किट' चढवून व घामाच्या धारा वाहत असतानाही अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने काम करत त्यांनी या दोन्ही विभागांशी संबंधित विविध वॉर्डमध्ये चांगली साफसफाई नियमितपणे राखली आहे.
*नवजात शिशु आणि मातांबाबत घेतलेली काटेकोर दक्षता*
*नवजात शिशु आणि मातांबाबत घेतलेली काटेकोर दक्षता*
👇
नवजात शिशुंच्या सुयोग्य पोषणासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. तथापि, आई मुलाला स्तनपान देत असताना, संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन, "आईने कोणती काळजी घ्यावी व ती कशा प्रकारे घ्यावी?" याबाबत सविस्तर मार्गदर्शन नियमितपणे केले जात आहे. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक मातेला सॅनिटायझरची बाटली, साबण, तोंडाला बांधायचा 'मास्क' (मुखावरण) इत्यादी बाबी नियमितपणे दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आईचा आहार देखील अधिकाधिक प्रथिनयुक्त व पोषणयुक्त असावा, यासाठी आईलाही नियमितपणे पोषक नाष्टा व जेवण दिले जात आहे. यामध्ये कडधान्य, डाळी, अंडी यासारख्या बाबींचा समावेश आहे. याच बरोबर नवजात शिशुंसाठी अंगडे - टोपडे - झबलेही दिले जात आहे. तसेच काही संस्थांच्या मदतीने मातांना टूथपेस्ट, टूथब्रश, तेल, कंगवा, टॉवेल, रुमाल इत्यादी बाबींचा समावेश असलेले 'किट' दिले जात आहे.
..
*वैद्यकीय संशोधन व लेखन प्रगतीपथावर*
👇
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ३०२ कोविड बाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीची घटना ही उपलब्ध माहितीनुसार वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतची एकमेव यशोगाथा आहे. या यशोगाथेचे शास्त्रशुद्ध डॉक्युमेंटेशन होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय संशोधकीय लेखन (Research Paper) सध्या प्रगतीपथावर आहे, अशी माहितीही या निमित्ताने नायर रुग्णालयाद्वारे आवर्जून देण्यात आली आहे
===
(संदर्भ क्र. जसंवि/१०५)

