येवला - कोरोना विषाणूचा कहर देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये सुरू आहे.त्याला प्रतिबंधित करण्यासाठी संपूर्ण जग 'प्रयत्नशील आहे.
येवला तालुका व शहराला सुद्धा कोरोना व्हायरस ने ग्रासले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.याच पार्श्वभूमीवर माननीय पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये येवला शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग , नगरपालिका व शिक्षण विभाग पुन्हा एकदा रणांगणात उतरलेला आहे. कोरोना योद्धा म्हटला की डॉक्टर, नर्स, पोलीस दादा, नगरपालिका कर्मचारी समोर उभे राहतात पण यांच्याबरोबर नेहमीच माझा शिक्षक बंधू उभा असतो, पण कोणाच्या लक्षात येत नाही. कोरोना सर्वेक्षणाचे काम जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून या राष्ट्रीय कार्यामध्ये शिक्षकाचा वाटा बहुमोलाचा आहे. अगदी चोख आणि प्रामाणिकपणे ते आपले कर्तव्य बजावत आहेत. आज शाळा जरी बंद दिसत असली तरी त्यांचे अध्ययन अध्यापनाचे काम हे सुरू आहे. ऑनलाईन अध्यापन करून कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी सुद्धा शिक्षक एका पावलावर तयार आहेत. फक्त त्यांचे काम रंगमंचावर असूनही पडद्यामागे असल्याचा भास लोकांना होतो.त्यामुळेच कदाचित शिक्षक घरी बसून शासनाचा पगार घेतात.असा सूर अनेकदा कानी ऐकू येतो तेव्हा मात्र खात्री पटते शिक्षक - पडद्यामागील कोरोना योद्धा म्हणून दुर्लक्षितच राहिला आहे.

