माझ्या सर्व बांधवांना नमस्कार. आज अड्मिन यांनी समाजातील सर्वांना एकत्रित करून व्यासपीठ तयार केले आणि समाजातील बांधवांना मार्गदर्शन व प्रोत्साहन कसे मिळेल याबाबत ग्रुप च्या सदस्स्यांची धडपड मी पाहिली म्हणूनच माझा संघर्षमय व खडतर प्रवास मी शब्दातून व्यक्त करत आहे. मी बजरंग विश्वनाथ चौगुले. जन्म- 1966. जुन्नर { शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला }. कुटुंबात आई वडील, आम्ही सहा भाऊ, तीन बहिणी. काम करणारे वडील एकटेच खाणारे पोट जास्त ,त्यात वडिलांच्या भावकीचा उन्माद .कित्येकवेळा जीवघेणा हमला झाल्यावर त्यांच्या जाचाला कंटाळून आईने पसरा आपल्या माहेरी जेउर { करमाळा } येथे हलवले.
त्याठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी तेथूनही भटकंती चालूच होती. अलिबाग, कोयना, परभणी, परळीवैजनाथ, नागापूर, पाथरडी , शेवगाव अश्या ठिकाणी मिळेल ते काम करून कुटुंबाचे पोषण करत वडील शेवटी तालुका जामखेड सोनेगाव. येथे स्थिर झाले. लहानपणी वडिलांना खाणीत दगड फोडताना पहायचो तसेच माळरानावर मोठ मोठ्या शिळा फोडताना पाहून जीव कासावीस होयचा लहानपणापासून च वडिलांना , मोठ्या भावांना, छोटे मोठे काम करून हातभार लावायचो. १९७२ साली पडलेल्या दुष्काळात खडी फोडण्याचे काम चालू असताना मी पण खडी फोडू लागलो.
शासनाकडून मजुरांना सुकडीची वाटप होताना भुके पोटी सर्वात अगोदर नंबर लावायचो . कधी कधी डबल लाईनीला लागल्यामुळे वाटप करणार्या सुपरवायजर कडून अपमान ही होयचा. कुटुंबाच्या दरिद्रयचे ओझे घेऊन आई वडील जीवनाच्या अंधारमय वाटेवर मोठ्या हिमतीने व धाडसाने आम्हा चिल्यपिल्यांचे असेल त्या परिस्थितीत संगोपन करीत होते. ई.- चौथी ते दहावी चे शिक्षण सोनेगाव येथेच झाले त्या दरम्यान वाटेल ते काम करणे आणि घर कामात मदत करणे आणि अभ्यासात चुणूक दाखवून दरवर्षी वर्गात पहिला नंबर असायचा.
शिक्षणात अव्वल नंबर व प्रत्येक खेल कुद मध्ये अग्रेसर असायचो. कष्टाळू व इमांनदार स्वभाव यांमुळे मी गावकरी आणि शिक्षक वर्ग यांच्या गळ्यातला ताईत बनलो होतो. कमी जास्तीला गावातील मंडळी व शिक्षक वर्ग कुटुंबाच्या अडचणीत हातभर लावत होते. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटेल ते शेतीकाम , नाला बिल्डिंग, इतर कुठलेही काम करून पुढील वर्षीचे पुस्तके वह्या व एक गणवेश माझ्या स्वतच्या हिमतीवर घेत असे. या कुटुंबाच्या भटकंती मुळे घर, संपती, गाडी किंवा एशोआरामाचे साधन कधी पहिलेच नाही. दहावी पास केल्या नंतर SSGM कॉलेज कोपरगाव, अहमदनगर. येथे सायन्स ला अडमिशन घेऊन हॉस्टेल व बोर्डिंग मध्ये मित्रांचे चुलते कै. बिरंगळ सर यांच्या आशीर्वादाने दाखल झालो दर महिन्याला बोर्डिंग चे व वसतिगृहाचे पैसे भरण्याची ऐपत नसायची त्यामुळे संजीवनी सह. साखर कारखाना येथे रात्री पार्ट टाइम मध्ये सात रुपये पंधरा पैसे हजेरी प्रमाणे कामाला जायचो. BSC करत असताना पैशाची गरज भसायची. मी कमवलेले पैसे आणि घरून आलेली तोकडी रक्कम शहरा सारख्या ठिकाणी कमी पडायची.
माझ्या शिक्षणा साठी आई वडील हमेशा चिंतीत असायचे. नाते वाईक व गावकरी यांच्यापुढे लाचार होऊन माझ्यासाठी कर्ज काढायचे. नऊ भावंडा मध्ये मी लहान असून मी एकटाच शिक्षण घेत असल्याने इथून मागे वडिलांना पैसे ची जास्त गरज नसे, पण माझ्यामुळेच आर्थिक चणचण भासत असे त्याची जाणीव माला वेळोवेळी होत होती. जिल्हा पातळी वरील कबड्डी च्या स्पर्धा संगमनेर,जि.अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाल्यावर विजेतेपद मिळाल्यावर टिम कॅप्टन या नात्याने मला अभिवादन करायला मिलिटरी चे मेजर साहेब येऊन त्यांनी दुसर्या दिवशी मिलिटरी भरती त्या शाळेच्या च ग्राऊंड वर असल्याच सांगून मला एका सुवर्ण संधीची चाहूल दिली.
गरिबीच्या काळोख्यात वाटचाल करीत असताना घरची परिस्थिति पाहता आलेल्या संधीचा फायदा मी नाकारला नाही. आणि सेप्टेंबर १९८५ साली मी BSC करीत असतानाच corp of signals मध्ये भरती झालो. जबलपुर मध्ये दीड वर्ष बेसिक/ टेक्निकल ट्रेनिंग पार पाडून फिरोजपुर { पंजाब} येथे पाहिली पोस्टिंग. तेथून IPKF च्या मार्फत श्रीलंका येथे युद्धात सहभागी. तेथून पुन्हा पंजाब. त्यानंर OP RAKSHAK, शियाचीन ग्लेशियर , जम्मू कश्मीर, लद्दाख, १९९९ सालचे कारगिल युद्ध ,जसलमेर,अश्या दुर्गम ठिकाणी १९ वर्षें सक्रिय सेवा करून १ डिसेंबर २००३ साली स्वेछा निर्वूत्ती घेतली. ९ मे २००४ रोजी MPSC मार्फत PSI प्री परीक्षा पास केली. त्यादरम्यान ३१ डिसेंबर २००३ ला आई वारली, पत्नीचे मोठे ऑपरेशन झाले म्हंनून सेनेमधील १९ वर्षाच्या प्राधिर्घ कालावधी नंतर फेब्रुवारी मध्येअभ्यासला सुरुवात केली. पुण्याला स्टडी सर्कल ला फेब्रुवरी आणि मार्च २००४ या दोन महिन्याचा कोर्स केला. आणि तीन महीने नियमित सोळा तास अभ्यासाचे नियोजन करून आपले सुखदुख बाजूला ठेऊन पुण्यात राहून वयाच्या ३८ व्या वर्षी PSI प्री परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण केली पुढे मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत चांगल्या शिताफीने पार पडले. पाहिली पोस्टिंग कोल्हापूर नंतर गडचिरोली, शेवगाव, अहमदनगर, आता सध्या नाशिक ग्रामीण येथे सेवेत आहे. या दरम्यान स्थानिक सामाज बांधवा वरीलअत्याचार व व्ययक्तिक अडीअडचणी चे निवारण माझ्या पद्धतिने करत आलो.
आम्ही जेथे जातो गुन्हेगारांचा कर्दन काळ होऊन जातो. व निष्पाप लोकांना न्याय मिळवून देऊन निपक्ष पाती सेवा देतो. अर्थातच चांगले काम करण्यासाठी भ्रष्टाचाराला फाटा द्यावा लागतो. गडचिरोली येथे कार्यरत असताना २०१०- २०१२ मध्ये अति दुर्गम नक्षलग्रस्त भागात एका अभियाना दरम्यान नक्षली कारवाई मध्ये सोबतच्या करमचर्य सह नक्षलआरोपी चंद्रपुर सेंट्रल जेल मधुम धानोरा येथे घेऊन जाताना गुरेकसा भागात नक्षल्यांनी शासकीय वाहनाला अपघात घडवून आणला त्यात ईश्वरी कृपेने व योग्य चतुर्याने बचावलो. त्याबद्दल शासनाकडून आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या खडतर जीवनाच्या प्रवासामधे गरीबी जवळून पाहिली एकवेळचे जेवण ही नशिबात नसताना आणि एका ड्रेस च्या वर ड्रेस कधी नसताना, राहायला घरही नसताना त्यावेळची झोपडी ला च महल समजून येईल त्या परिस्तितीला तोंड देऊन आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन अंधकारात ही मार्ग काढत नाव लौकिक स्वबळावर कमावले.
कॉलेज मध्ये असताना पुणे विद्यापीठ कडून कबड्डी खेळाचे नेतृत्व केले. तसेच जिल्हा पातळीवर होलीबोल खेळून अनेक पुरस्कार मिळवले. मिलिटरी मध्ये असताना सैन्य सेवा मेडल, विदेश सेवा मेडल {श्रीलंका युद्ध}, कारगिल युद्ध सेना मेडल, उच्चतुंग सेवा मेडल{ सियाचीन ग्लेशियर} आणि पंजाब मधील अतिरेकी मुठ्भेड, आसाम मधील बोडो उग्रवादी यांच्याशी चकमक , जाफना मधील LTTE उग्रवादी चकमकी झाल्या..परंतु ईश्वरी कृपेने सकारात्मक व परोपकारी वृत्ती आणि सच्चे राष्ट्रप्रेम,आई वडिलांचा आशीर्वाद असल्याने प्रत्येक ठिकाणी जीवदान मिळत गेले. आता राहिलेले जीवन कुटुंब, राष्ट्र आणि समाज सेवे साठीच खर्ची लावण्याचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रसेवा आणि समाजसेवा करताना परिस्थिति आडवी येत नाही त्यासाठी फक्त जिद्द आणि उद्देश साफ असावा लागतो हे माझ्या कुटुंबापासूंच मार्गदर्शन करून इतर समाज बांधवाना सांगू इच्छितो. माझ्या चार मुलांना मी वेळोवेळीच त्यांचं भवितव्य घडवण्या विषयी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असतो. असेच इतर बांधवानी कष्ट करून आपले ध्येय ठरवून स्पर्धा परीक्षा किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात चिकाटीने सहभाग घेऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा उद्धार करावा व प्रगतशील व्हावे.लिहिण्या सारखे भरपूर आहे पण थोडक्यात व्यक्त होणे हिताचे ठरेल एवढेच.
धन्यवाद..!!
बजरंग विश्वनाथ चौगुले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नाशिक (ग्रामीण).

