भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेकरांच्या राजगृह बंगल्यावरील तोडफोडीचा शिर्डी व परिसरात तीव्र निषेध..!!
सावळीविहीर( प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या बंगल्यावर काही समाजकंटकांनी काल तोडफोड केली.त्यामुळे संपूर्ण देशातील नागरीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील नागरिकांच्या, समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिर्डी व परिसरातून मोठ्या प्रमाणात आता होऊ लागली आहे.
भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या बंगल्यावर दिनांक 7 जुलै 20 20 रोजी काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे हे घर समाज बांधवांसाठी एक प्रेरणास्थान आणि अस्मिता असून ते सर्वांसाठी राष्ट्रीय स्मारक अाहे. या राष्ट्रीय स्मारकाची समाजकंटकांनी तोडफोड केली. याचा शिर्डी व परिसरातील गावांमधून तीव्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी सावळीविहीर येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अनिल वाघमारे, कैलास पगारे आदी कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंन्स पाळत निषेध केला तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिमोन जगताप व कार्यकर्त्यांनी या घटनेतील दोषी आरोपींना त्वरित अटक करावी म्हणून शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदनही देण्यात आले आहे. तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने अॅड.अविनाश शेजवळ यांनी पत्रकाद्वारे या घटनेचा जाहीर निषेध केला.भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने राहता तालुका अध्यक्ष रमेश कसबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली असुन अॅड.अनिल शेजवळ यांनी आपल्या पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शिर्डीत सर्व सामाजिक संस्थांनी, संघटनांनी, नागरिकांनी या घटनेचा धिक्कार केला आहे. त्याचप्रमाणे शिर्डी परिसरातील सावळीविहीर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राज्य मार्गदर्शक शांताराम रणशूर ,राहता तालुका अध्यक्ष गौतम गोडगे, लक्ष्मण बनसोडे, प्रमोद कोपरे, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच निमगाव येथे उपसरपंच अजय जगताप व कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्याच प्रमाणे सर्व नागरिकांनी ,सामाजिक संस्थांनी, संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिर्डी व परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी दिला आहे.

