हिंजवडी:-
पेटीएममधून बोलत असल्याची बतावणी करुन केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करत ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून भामट्याने एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 18 जून 2020 रोजी हिंजवडी येथे घडला.
याबाबत मिलिंद शरद गावडे (वय 57, रा. मेगापोलीस सोसायटी स्प्लेंडर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे यांना 18 जून 2020 रोजी 7478868288 या क्रमांकावरुन फोन आला. ‘मी पेटीएममधून बोलत आहे. तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे. ते झाले नाही’,असे त्याने सांगितले.
तसेच त्याने गावडे यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गावडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

