shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिस व प्रशासकीय यंत्रणेने आता जनतेला मोकळा श्वास घेऊ द्यावा...??

दि.23/08/2020
नमस्कार !! हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती !!
माझं नाव संतोष ... नावाकडे पाहून असं कुठे जाणवते का ?संतोष नावाच्या व्यक्ति संतोषी असतील म्हणून ... पण कोणी जर संतोष म्हणून हाक मारली की ...  मला मात्र मानसिक संतोष मिळतो ..पण ज्यावेळी मनाच्या विरुद्ध गोष्टी समोर घडतात त्या वेळी मन मात्र अस्थिर होऊन मनातील खंत अथवा सल  कागदावर उमटवायला भाग पाडते .. कुठेतरी , कोणा जवळतरी हलकं झालं म्हणजे मनावरचं ओझं कमी होतं आणि संतोष होतो . या जिवनात संतोष टिकवून ठेवत असताना दिवसभरातील अनेक घटना मनाला विचलित करत राहतात ..

कर्मचारी म्हटलं की कार्यालयीन व्याप आणि त्याचबरोबर घरच्या समस्या ,यामध्ये तो सतत अडकून, गुंतलेला असतो .. हे प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्याला मान्यच करावे लागेल ... तरीही एखाद्या कर्मचाऱ्याला दुसरा कर्मचारी समजून घेताना कधीच पहायला मिळत नाही ... लहाणपणीचा पोलिस मामा मला तर आजकाल कधीही शकुनी मामाच वाटला... काही अपवाद सोडले तर ... सगळे सारखेच ... यांच्या अंगवळणीच पडलेले ... सहज कधी प्रसंगानुरूप ओळखीच्या पोलिसांना विषय काढून विचारले .. अरे दादा नो, तुम्हाला समोर प्रत्येक वेळी दखलपात्र गुन्हा केलेला आरोपीच आहे असे का वाटते ? तुमची भाषा पाहून सज्जन माणूस सुद्धा गुन्हेगार बनू शकतो .हे माझं नादान वक्तव्य आहे असे बरेच जण म्हणतील ही .. पण हे याचं उत्तर देताना सहज बोलतात ...आरोपीना असेच बोलावे लागते .. 

पण मला सतत प्रश्न पडतो की , आरोप सिद्ध झालाच नाही तरीही आरोपी कसा होतो ??... काल शुक्रवार माझ्या शाळेचा शालेय पोषण आहार आला होता..केंद्रप्रमुख यांनी दक्षतेने मला फोन करून सांगितले ... कर्मचारीच ते पण सतत व्यस्त ... काही पालक जवळपास एक महिन्यापासून फोन करुन विचारायचे .. मलाही मनोमन आनंद झाला .. ज्या पालकांना पोटाची खळगी भरण्यासाठीच दिवसभर , अहोरात्र काबाडकष्टंच करावे लागते ते वारंवार विचारायचे... सर काल त्या अमक्या शाळेत तांदूळ वाटप केला.. तमक्या शाळेत उद्या वाटणार आहेत ... आपल्या शाळेत कधी वाटणार ?? ज्यावेळी असं ऐकतो त्यावेळी कान बधीर असल्याचे भासते ..

यापूर्वी मार्च महीन्यात सर्व पालकांना देऊन , परिसरातील काही गरजू लोकांनाही वाटण्यात आला असल्याने वारंवार गरजू पालक विचारत होते ... कोरोनामुळे बऱ्याच पालकांचे हात गोठले आहेत ... मी म्हटलं अहो , आपल्या शाळेच्या  वॉटसअप ग्रुपवर टाकलेला अभ्यास , आमचा लाडका विद्यार्थी करतो का नाही ? हळू आवाजात करतो की ... माझ्या मनाला बरं वाटते .. पुन्हा समोरुन हळूचच.. अहो , सर आमच्याकडे छोटाच मोबाईल आहे ... मग .. हो ? नाही तो अभ्यास घेतो अनामिकेकडून ... शेजारीच राहते .. पण तिच्या घरची सारखे ,पोराला थोडयावेळानं ये म्हणून सांगत्यात .... मी म्हटलं, पुस्तके जी दिली आहेत त्यातून त्याला अभ्यास करायला सांगा .. काही अडचण आली तर पुन्हा मला फोन करा ... उद्या शनिवार सकाळी 9 वाजता तांदूळ, हरभरा , मूग घ्यायला शाळेत या ... आवाजात बदल झाला आणि आनंदभऱ्या स्वरात किती वाजता येऊ ? असा प्रश्न समोरून आला ... मी म्हटलं अहो , ग्रुप वर टाकलं की पहा जरा ... असे बोलताच शब्द मध्येच थबकले ... हां हां नऊ वाजता या .... छोटा मोबाईल !!  माझ्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले .. सर्वांना समान तांदूळ वाटप करण्यासाठी एक माप बनवावे ... म्हणून संध्याकाळी पाचच्या आसपास पाईपलाईन रोडला गेलो . येताना प्लॅस्टिकचा 1 किलोचा चॉकलेटचा रिकामा  डब्बा घेऊन येत होतो ...

अचानक एकविरा चौकात सिव्हील ड्रेसमध्ये असणाऱ्या व्यक्ति नी कुठे चालला असा प्रश्न करत विचारणा केली .. मी म्हटलं घरी चाललो आहे .. "मास्क" कुठे आहे!! मी दचकलो ... गाडी बाजूला घ्यायला सांगितली ... पोलिस आणि महापालिका मिळून त्यांच्या मनाप्रमाणे नियम तोडणाऱ्यावर कार्यवाही करण्याची धमकी देऊन पावती फाडण्याची दमदाटी करत होते .. मी हे सर्व माझ्या डोळ्याने पाहत होतो .... मलाही बाजूला घेतलं .. माझ्याकडे मास्क होता परंतु त्यावेळी तोंडावर नव्हता .. त्यांनी मला सांगितले की ,500 रुपयाची पावती घ्या आणि जा .. मी म्हटलं अहो  ,आत्ताच *मास्क* काढला आहे ... मी ही एक कर्मचारीआहे त्यात अपंग आहे असे मी सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो .. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं  ... तुम्ही कर्मचारी आहात पण आमच्या  (मनहुकमी )नियमानूसार तुमच्या तोंडावर मास्क नव्हता .. मग पावती घ्या आणि जा .... मग नंतर मी शिक्षक असल्याचं सांगितलं ... त्यानंतर तर ... शिक्षक आहात!!.. मग तर गुपचूप पावती फाडा आणि जा ... माझा इथं मात्र स्वाभिमान जागा झाला .. शिक्षकानं गुपचूप का रहायचं ? 

वेळ खूप झाली होती . घरचे फोन येत होते .. काय करावे सुचेना .. संघटनेत काम करत असल्याने समोर होत असलेला अन्याय पाहणं जड जात होतं .. पोलिसाची भाषा ऐकून त्यांचा नियम शिकविण्याचा हेतुच नव्हता हे स्पष्ट पहायला मिळत होतं . आम्ही काय करु शकतो हे सांगण्यात तरबेज दिसत होते .. दुर्बल लोकांना अडवून त्यांच्याकडून फक्त पावती फाडणे एवढाच हेतु होता . मन द्वंद्व अवस्थेत अडकलं होतं . पण विचाराची लढाई करण्याची वेळ नाही असे एक मन बोलत होते. महापालिकेतील ओळख होती पण ते पण मान खाली घालून, नाही तुम्हाला 250 रुपयाची तरी पावती घ्यावी लागेल व ती द्यावी असा त्यांचा मानस होता .. पण माझ्या मनात संघर्षाचं वादळ निर्माण होत होतं .. माझा प्रामाणिक हेतुच वेगळा होता .. पोलिस म्हणे आम्ही हे कोणासाठी करतो ? आम्ही इथं उभा राहून तुमच्यासाठीच आमच्या लेकरा बाळापासून , घरापासून दूर राहतो .. अशा या भावनिक वाक्याच्या, सहानभूतीच्या नावाखाली त्यांचे कर्तव्य झाकून टाकताना दिसत होते .... 

बरेचसे पोलिस अथवा पोलिस अधिकारी अतिशय चांगले आहेत यात शंका नाही पण ही लुटारू व दंडमशाही वृत्ती मागासलेली असून बळावत चालली आहे याचा खेद वाटतो . . मला असे म्हणायचे आहे की , जर  माननीय तुकाराम मुंढे (IAS)यांचे सारखे कर्तबगार अधिकारी सोशल मिडियाच्या माध्यमातून  "मास्क" कोणी वापरावा ?? हे सांगत असतील ,तर मग हा काय प्रकार आहे ?? असा माझ्यासारख्या सुशिक्षित माणसांला पडलेला प्रश्न आहे .... डबल सीट असेल अथवा गर्दीचे ठिकाण असेल तर प्रश्न पडायला हरकत नाही पण सिंगल  व्यक्तिला अडवणे हे कोणत्या कायदयात बसते ?त्यात  दिव्यांगाची प्रतिकारशक्ती कमी असते असे केंद्र शासनापासून महाराष्ट्र शासन सांगते ... मास्क मुळे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो हे सहज सामान्याना समजणारी गोष्ट आहे .. तरीही हा हुकुमशाही नियम काय कामाचा ??पोलिस हा कर्मचारी आहे . 

इतरही विभागात कर्मचारी कोरोना कार्यात सहभागी आहे . इतरानाही राष्ट्रहित व समाजहिताची जाणिव आहे .. पण हे पोलिस नियम न सांगता उद्धटपणे , उर्मटपणे दादागिरी करुन पावती फाडण्यावर भर का देत आहेत ? याचा अर्थ त्यांचाही मेंदू त्यांच्या ताब्यात नसून इतर कोणाच्या तरी ताब्यात आहे काय ? असे मनोमन वाटते . शेवटी मनोमन प्रशासनाशी चर्चा करण्याचा मानस बाळगून 250 रु  ऑनलाईन पालिकेचे  श्री अमित मिसाळ यांच्या खात्यावर टाकून घरी निघून आलो . शेवटी पोलिस असो अथवा इतर कोणीही असो , माणूस मात्र भावनाशुन्य असलेला ,रोबोट बनत चाललेला आहे . हे सिद्ध होते व खेद वाटतो .  लोकशाहीतील चौथ्या स्तंभाचे मनःपूर्वक आभार जे सत्याचा सामना करतात ... आपल्या लेखणीतून सामान्य जनतेचा आधार बनतात .. सुप्रश्नांना प्रसिद्धी देऊन आवाज उठवतात ..संघर्ष करा , जीवन आनंदी बनवा..!!

आपलाच
राज्य उपाध्यक्ष
श्री संतोष सरवदे
म राज्य अपंगकर्मचारी/ अधिकारी महासंघ व संघटना मुंबई 32.
close