August 07, 2020, पिंपरी-चिंचवड,
पिंपरी :- पिंपरी चिंचवडकांना तसेच मावळवासियांना पाणीपुरवठा करणार्या पवना धरणात पाण्याची पातळी वाढत आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडायला सुरुवात झाली असून गेल्या २४ तासात धरण क्षेत्रात ३७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात ४.५५ टक्क्यांनी वाढ झाली असून साठा ४६.७३ टक्के झाला आहे.
पावसाळ्यातील जुन आणि जुलै दोन महिने संपल्याने शहरवासीयांवरील पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून पाऊस पडत आहे. पाच दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. गेल्या २४ तासात धरण क्षेत्रात ३७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. ४.५५ टक्क्यांनी वाढ झाली असून १ जूनपासून ७५५ मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. पाणीसाठ्यात ११.४४ टक्के वाढ झाली आहे.
धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ९४.१७ टक्के होता. तर, २७४८ मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. त्या तुलनेत यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे.

