मुरुड-जंजिरा शहरा विषयी महिती
विकास मेहेतर
'मुरुड-जंजिरा' हे शब्द कानी पडताच डोळ्यासमोर उभा
रहातो तो सागर लाटांशी लाडिवाळपणे खेळणारा
निळाशार अरबी समुद्र, हळुवारपणे बागडावी अशी सोनेरी
वाळूमय चौपाटी, नम्रपणे गगनाचे वेध घेणार्या हिरव्या
नारळी पोफळीच्या बागाम आपण मुरुडला भेट दिल्यची
साक्षीदार असलेली लालभडक माती, माणिकमोत्यांनी
भरलेली पिवळीशार शेतजमीन आणि त्याच्यापलिकडे
सदाहरित असणार्या डोंगरकड्या व त्याच्या उरापोटावर
बागडणारे शुभ्रधवल धबधबे..!
या सप्तरंगाप्रमाणे येथे भेट देणार्या पर्यटक पाहुण्यांचे
आदरातिथ्य करणारी मुरुडची माणसे देखील पर्यटकांना
आकर्षित करुन घेण्यामध्ये पटाईत आहेत, नव्हे तर या निसर्गानेत्यांना हे वरदानच दिले आहे.
'मुरुड्-जंजिरा' हे आज पर्यटकांचे आवडते 'पर्यटन केंद्र' म्हणून नावारुपास आले आहे. मुंबईसारख्या महानगरीमध्ये सततची दगदग सहन करणारे हौशी पर्यटक 'वीकएन्डला' या
पर्यटनस्थळाला आवर्जून येत असतात, मुंबईपासून मुरुडला
येण्यासाठी इ.स.१५३० मध्ये पोर्तुगिजांनी बांधलेल्या
चौलच्या किल्ल्याच्या भिंतीदरवाज्यातून बाहेरपडल्यानंतर मुरुड दर्शनाला सुरुवात होते. प्राचीन काळी आपल्या देशांचा परराष्ट्रांशी सागरी व्यापार ज्याखाडीतून चालत असे ती नागोठण्याची खाडी आपले पायधुण्यासाठी सज्ज असते. मुरुडमध्ये घेऊन जाणारा याखाडीवरील सेतू म्हणजे अधुनिक रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील पहिला आदर्श सेतू होय. हा सेतू पार केल्यावर साळावच्या प्रसिद्ध विक्रम विनायक दर्शन घेऊन मुरुडकडे जाताना पोर्तुगिजांच्या उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेला कोर्लईचा 'अभेद्य किल्ला' हा तर किल्ला प्रेमींचे मोठे आकर्षण आहे. त्या किल्ल्यावर चढताना आजही मुंबईकरांची दमछाक होते.
तेथून पुढे जाणारा नागमोडी रस्ता उजवीकडे पश्चिम
लाटांचे तुषार झेलित आणि पूर्वेकडील कडेकपारीच्या
दर्शनाने पुढे सरकतो. काशिदची सागरपट्टी ही तर
पर्यटकांची पंढरी समजली जाते. तेथून पूर्वेकडे उंचच उंच
डोंगरकडे दिसतात. त्या निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर 'केसोली' हे संस्थानाच्या उन्हाळी राजधानीचे ठिकाण (मुरुडचे माथेरान) दृष्टीस पडते.काशिद सर्व्हे सोडून एक अवघड वळण पार केल्यानंतर जागृत देवस्थन सिद्धिविनायकाचे नांदगाव हे ठिकाण आपले स्वागत करते.

