इंदापूर। प्रतिनिधी : (तात्याराम पवार)
दि.1/8/20
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अडचणीतील दूध उत्पादकांना मदत करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.त्यामुळे राज्य सरकारला दुधास प्रतिलिटरला 30 रुपये दर देण्यास भाग पाडू, असा इशारा भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.1) इंदापूर येथे दिला.
इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या वतीने दुध दर वाढीचे तहसील कार्यालय गेटसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध दरवाढीच्या मागणीचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी स्वीकारले. यावेळी आंदोलनस्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळदीचे दूध स्टोव्हवर तयार करून त्याचे जनतेला,पोलिसांना व पत्रकारांना हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शिल्लक दुध हे वाया न घालवता ते इंदापूर कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी पाठवून देण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दुध दर वाढीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तसेच 21 जुलै रोजी राज्यात सर्व तहसील कार्यालयात भाजप महायुतीच्या वतीने निवेदने देण्यात आली.तरी सरकारने अद्यापी दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर जाहीर केलेला नाही.सहकारी दूध संघांकडील सर्व दुधाची खरेदी करावी, अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी तयार करावी, दुधास प्रतिलिटर 10 रू.अनुदान द्यावे या मागण्यांचा निर्णय सरकारने घेतलेला नाही, सदर निर्णय होईपर्यंत भाजपचा संघर्ष चालूच राहील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तालुक्यात गावोगावी भाजपच्या वतीने आज दूध दरवाढीचे आंदोलन झाले. जर शासनाने दरवाढ केली नाही तर आंदोलन तीव्र करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाजप न्याय मिळवून देईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी अंड.कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे,भरत शहा, शिवाजी मखरे, शकील सय्यद, कैलास कदम हर्षवर्धन कांबळे,माऊली वाघमोडे, राम आझबे, महेंद्र्र रेडके, दीपक जाधव, अमोल इंगळे .यावेळी भाजप व महायुतीतील रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते. लक्ष्य वेधी गोमाता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलनात सहभागी झालेल्या गोमातेचे पूजन केले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचेसह कार्यकर्ते हे सरकार विरोधात घोषणा देत बाबा चौक मार्गे तहसीलदार कार्यालय गेट समोर आले.मुक्या सरकारचा मुक्या जनावरांकडून जाहीर निषेध, मला वाचवा, ही वाक्य रचना असलेली गाईच्या अंगावरील झूल सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

