सावळीविहीर (प्रतिनिधी):
शिर्डी शहरात यावर्षी कोरोनामुळे आर्थिक संकटात सर्व शहरवासीय, दुकानदार, व्यवसायिक असताना शिर्डी नगरपंचायतीने पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे व या आर्थिक संकटातच घरपट्टी ,पाणीपट्टी बिले पाठवली असून वसुली सुरू केली आहे .त्यामुळे शिर्डी शहरात आता शिर्डी नगरपंचायतीच्या विरोधात मोठा आवाज उठवला जात आहे व दिवसेंदिवस हे वातावरण पेटत आहे. हि वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी त्वरित रद्द करावी.यासाठी महिला शिवसेना आघाडी, शिर्डी शिवसेना शहर, तसेच लहुजी सेना, त्याचप्रमाणे विराट प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन ही जाचक पाणीपट्टी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी या घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी म्हणून देण्यात आलेल्या निवेदनाच्या वेळी नगराध्यक्षा नसल्यामुळे मोठा प्रसंग निर्माण झालाहोता. शिवसेनेने यावेळी मोठमोठ्याने घोषणा देऊन निषेध व्यक्त करत नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून हे निवेदन तेथील खुर्चीला चिटकवण्यात आले.
ऐन कोरोनाच्या आर्थिक संकटात शिर्डीतील व्यवसायिक, रहिवासी यांना वाढीव पाणीपट्टी आकारली आहे तसेच घरपट्टी वसुली सुरू केली असून ही त्वरित वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी रद्द करावी. यासाठी एक निवेदन शिर्डी शहर शिवसेनेच्या वतीने आज बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांना देण्यात येणार होते.शिर्डीतील शिवसेना पदाधिकारी ,कार्यकर्ते शिर्डी नगरपंचायत मध्ये गेल्यानंतर तेथे मात्र नगराध्यक्षा अर्चनाताई कोते या नव्हत्या. त्यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बोलवण्यात आले.मात्र नगराध्यक्षा निवेदन स्वीकारण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आल्याच नाही. त्यामुळे शिर्डी शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी शिर्डी नगरपंचायत सत्ताधारी गट व नगराध्यक्षा यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या नगराध्यक्षांच्याच खुर्चीला हार घालत खुर्चीला हे निवेदन चिटकून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येथे चिटकवण्यात आलेल्या या शिर्डी शहर शिवसेनेच्या या निवेदनात म्हटले आहे की,शिर्डी शहरांत कोरोना मुळे गेल्या साडे पाच महिन्यापासून श्री साई मंदिर बंद आहे. तसेच येथे साईभक्त येणे बंद असल्यामुळे शिर्डी शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय रोजीरोटी सर्वकाही बंद असून आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना नगरपंचायतीने पाणीपट्टी मोठी वाढ केली असून पाणीपट्टी व घरपट्टी या पावत्या शहरातील रहिवाशांना या कोरोना आर्थिक संकटात पाठवून वसुलीची मोहीम सुरू केली आहे.
जर वेळेत वसुली झाली नाही तर व्याजासह वसूल करण्याचे फर्मान सोडले असल्यामुळे शिर्डी शिवसेनेच्या वतीने नुकतेच यासंदर्भात शिर्डी नगरपंचायतला निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की,शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधारी गटाने कोरोनाच्या या आर्थिक संकट काळात या वर्षी घरगुती पाणीपट्टी मध्ये पंधराशे रुपये वरुन दोन हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे, तसेच व्यापारी पाणीपट्टी मध्ये पंधराशे रुपये वरून थेट दहा हजार रुपये पाणीपट्टीची वाढ केली आहे.ही वाढ म्हणजे मोगलां सारखा जिझिया कर असल्याचे त्यांनी म्हटले असून हा जिझिया कर शिर्डीतील कोणी पाणीपट्टी स्वरूपात भरणार नाही.
जर शिर्डी नगरपंचायतचे अधिकारी किंवा कर्मचारी या पाणीपट्टी घरपट्टी चे बिले सध्याच्या काळात घरोघर देण्यास आले किंवा वसुली करण्यात आले तर त्यांना शिवसेना आपल्या धडक कारवाई द्वारे पिटाळून लावतील जर शिर्डीच्या नगरपंचायत मधील सत्ताधारी गटाला पैसे पाहिजे असेल तर त्यांनी स्वतः येऊन बीले द्यावीत.व बिले वसूल करावीत. असे आवाहन यावेळी या निवेदनात करण्यात आले असून या वर्षी कोरोनामुळे शिर्डीकर मोठ्या आर्थिक संकटात आहे.त्यामुळे शिर्डी नगरपालिकेने आपल्या पालिका फंडातून किंवा श्री साईबाबा संस्थान व शिर्डीकरांच्या सहकार्याने शिर्डी नगरपंचायत ला मागील वर्षी मिळालेल्या स्वच्छता बक्षीस मधून मिळालेले 15 कोटी व यावर्षी मिळालेले 15 कोटी या निधीतून हा सर्व कर भरून नागरिकांना या वर्षी या सर्व करातून मुक्तता करावी.अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन शिर्डी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. मात्र हे निवेदन शिर्डी न,पं, च्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांना देण्यात येणार होते, त्यांना तसे कळविण्यात आले होते.
मात्र नगराध्यक्षा नगरपंचायत कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी आल्या नाहीत. त्यामुळे शिर्डी शहर शिवसेनेच्या वतीने शिर्डी नगरपंचायत मध्ये मोठ मोठ्याने नगराध्यक्षा अर्चनाताई होते व सत्ताधारी गटाचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालुन तेथेच खुर्चीला हे निवेदन चिटकवण्यात आले व जाहीर निषेध करण्यात आला. व येत्या आठ दिवसात शिर्डी शहरातील दुकानदार, व्यवसायिक, नागरिक यांची घरपट्टी,वाढीव पाणीपट्टी, तसेच नगरपंचायत व्यापारी गाळ्याचे भाडे माफ केले नाही. तर शिर्डी शहर शिवसेनेच्या वतीने धडक कारवाई आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे, यावेळी शिर्डी विधानसभा मतदार संघ शिवसेना संघटक कमलाकर कोते, राहता तालुका शिवसेनाप्रमुख संजयआप्पा शिंदे ,शिर्डी शहर शिवसेनाप्रमुख सचिन कोते, विजयराव जगताप माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप ,राहुल गोंदकर आदी शिर्डीतील शिवसेनेचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिर्डी शहर शिवसेने प्रमाणेच आज शिर्डी येथील लहुजी सेनेच्या वतीने व विराट प्रतिष्ठान च्या वतीने ही समीर अण्णा वीर यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद कोते, गिरीश सोनाजी, संपत जाधव ,जितेश लोकचंदानी, दिपक भांड, प्रवीण पवार ,संतोष आरणे ,रवींद्र भोडंगे यांनी शिर्डी नगरपंचायत मध्ये जाऊन शिर्डीचे नप चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना शिर्डीतील कोरोना काळातील घरपट्टी तसेच नगरपंचायत व्यापारी गाळ्यांचे भाडे व वाढीव पाणीपट्टी त्वरित माफ करावी ,नाहीतर आठ दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे काल शिर्डी शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ही शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी डोईफोडे यांना निवेदन देऊन घरपट्टी ,पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आठ दिवसानंतर शिर्डी नगरपंचायत समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा शिर्डी शहर महिला शिवसेना आघाडीने इशारा दिला आहे.
या सर्व निवेदन, इशारे यामुळे शिर्डीतील घरपट्टी, पाणीपट्टी प्रकरण चांगलेच वाढत चालले असून शिर्डी नगरपंचायत यावर काय निर्णय घेते. याकडे सर्व शिर्डीतील नागरिकांचे, दुकानदार, व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

