गडचिरोली ता.३०:- ग्रामीण भागातील गावागावात ग्रामस्थांना आरोग्य विषयक जनजागृती, कोरोना आजारा बाबत माहिती देणे, कोरोना संसर्गाबाबत राबवित असलेल्या उपाय योजनांची माहिती देणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारीचे महत्व पटवून देणे यासाठी कलापथकांचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.
जिल्हा स्तरावरून जिल्हा आरोग्य विभाग गडचिरोली मार्फत सदर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी 6 कलापथकांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हयात 10 तालुक्यात 38 ठिकाणी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त 5 मिनीटात तपासणी पुर्ण होते. नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवयक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

