सावळीविहीर(प्रतिनिधी) :
श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ हॉस्पिटल व श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील इन व आउटसोर्सिंग परिचारक व परिचारक यांचे विविध मागण्यासंदर्भात गुरुवार सकाळ पासुन सुरू झालेले बेमुदत काम बंद आंदोलन हे साई संस्थानने त्यांच्या मागण्या बाबत सकारात्मक भुमिका घेतल्याने व दरमहा वेतना संदर्भातली मागणी दिनांक 28 सप्टेंबरच्या समितीच्या बैठकीमध्ये ठेवून त्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन दुपार नंतर मागे घेण्यात आले आहे. मात्र 28 तारखेनंतर मागण्या मान्य न झाल्यास परत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिर्डी येथील श्री साईसंस्थानचे श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल असे दोन हॉस्पिटल असून येथे इन व आऊटसोर्सिंग परिचारक व परिचारिका मोठ्या संख्येने काम करतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. मात्र त्यांचा चाळीस टक्के पगार संस्थांननी कपात केला. तसेच कायम कर्मचाऱ्यांना 65 हजार रुपये पगार असताना या कर्मचाऱ्यांना मात्र 11 हजार 500 रुपये महिना पगार मिळत असून तो 45 हजार रुपये महिना करावा. अशी त्यांची प्रमुख मागणी आहे .अशा व इतर मागण्यांसाठी ते गुरुवारी रुग्णालयाच्या बाहेर बेमुदत काम बंद आंदोलन करत धरणे धरून बसले होते.
त्यामुळे संस्थानच्या रुग्णालयात असणाऱ्या रुग्ण व डॉक्टरांनाही हाताखाली कोणी नसल्यामुळे अडचण येत होती. शिर्डीतील माजी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते तसेच जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते यांनी या बेमुदत कामबंद आंदोलन कर्त्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व चर्चा केली. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्या कार्यालयात जाऊन या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन चर्चा केली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत या कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला जाईल,,तसेच त्यांना येथील कोरोणा काळात काम करत असताना काही प्रॉब्लेम आला तर त्याचा खर्च संस्थान करेल, तसेच ४ पगारी सुट्ट्यांचा विचार केला जाईल, मात्र दरमहा 45 हजार रुपये वेतन मिळावे, या मागणीसाठी संस्थांनच्या समितीची 28 सप्टेंबर रोजी बैठक असून त्या बैठकीत हा निर्णय घेऊ. तसा प्रयत्न करू. असे आश्वासन दिल्यानंतर व शिर्डीतील ग्रामस्थांच्यावतीने व या नेत्यांच्या मध्यस्थीमुळे हे बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले की, श्री साई संस्थान व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका या कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत घेतली आहे. दरमहा पंचेचाळीस हजार रुपये वेतन मिळावे.यासाठी मात्र 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या समितीच्या बैठकीत निर्णय होण्याचे आश्वासन कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहे.जर त्यानंतरही ही काही निर्णय घेतला गेला नाही किंवा कोरोणा च्या काळातील 40 टक्के कपात केलेला पगार या परिचारक व परिचारिकांना देण्यात आला नाही तर आम्ही सर्व शिर्डीकर या आंदोलनकर्त्यांची बाजू घेऊन त्यांना पाठिंबा देऊ. असा इशाराही यावेळी कैलास कोते यांनी दिलाआहे. जर 28 तारखे नंतर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही परत बेमुदत काम बंद आंदोलन करु ! असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

