गडचिरोली ता.२१:- नक्षलविरोधी अभियान राबविताना जिल्ह्यातील २१२ जवानांनी आपले बलिदान दिले आहे. त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शौर्य स्थळ या वास्तूची उभारणी करण्यात आली. या वास्तूचे उद्घाटन रविवारी शहीद कुटुंबाचे हस्ते व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थित करण्यात आले.
शोर्य स्थळ नक्षलविरोधी लढ्यासाठी सर्वांना सदैव प्रेरणा देणारे आहे. या शौर्य स्थळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांना शहीद जवानांची शौर्यगाथा समजून घेता येईल. याकरिता सर्वांनी या स्थळाला आवर्जून भेट द्यावी असे आव्हान पो.अधीक्षक बलकवडे यांनी केले.
या वास्तूमध्ये नक्षलविरोधी लढ्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्यगाथांचे लेखन करण्यात आले असून जवानांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्रफीतही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबर ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पदक व राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहेत त्यांच्या नावांचा उल्लेखही या ठिकाणी करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिस दलाने जिल्ह्यातील आदिवासी बांधवासह प्रत्येक घटकासाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांनाही शौर्य स्थळांमध्ये स्थान देण्यात आले आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सहाय्यक पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबिय उपस्थित होते.
पोलीस रुग्णालयाचे नूतनीकरण व चिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा..
पोलिस अधिशक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पोलीस दलाकरीत असलेल्या रुग्णालयाचे नूतनीकरण आणि बहुउद्देशीय चिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. नक्षलविरोधी अभियान राबवणाऱ्या जवानांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक मशनेरीसह तज्ञ डॉक्टरांची चमू सदैव सेवेत राहणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे.

