shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता! जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन!..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी) :
अहमदनगर जिल्ह्यामध्ये  भारतीय हवामान वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला असून दिनांक 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या कालावधीत नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने एका पत्रकात म्हटले आहे.

 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे की ,अहमदनगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 623 मिलिमीटर म्हणजे 139 टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदी , गोदावरी नदी ,मुळा नदी, तसेच सीना नदी, घोडनदी, भीमा नदी ,या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जर पाणलोट क्षेत्रात आणखी जोरदार पाऊस झाला तर या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती सदृश्य निर्माण होऊ शकते, भारतीय हवामान वेधशाळेने 16 ते 18 सप्टेंबर या कालावधीत जोरदार पावसाचा इशारा अहमदनगर जिल्ह्यात दिला असल्यामुळे नागरिकांनी या सर्व परिस्थितीचा विचार करून जर नदीच्या किनारी आपण राहत असाल तर नदीची पातळी, पाण्याची वाढत गेली तर लगेच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

 तसेच  ओढे नाल्या पासून जरा दूर वास्तव्य करावे.गडगडाट व विजेचा लखलखाट असताना व मुसळधार पाऊस सुरू असताना प्रवास टाळावा, जोरदार वादळ असल्यास रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडण्याची शक्यता असुन अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वेळेस सुरक्षितस्थळी थांबून घ्यावे, पडक्या व जुनाट ईमारतीत या कालावधीतच आसरा घेऊ नये. जोरदार पावसामुळे डोंगरकडा व दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याला राहणाऱ्या रहिवाशांनी अशा परिस्थिती सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा .कोणत्याही ओढ्याच्या किंवा नदीच्या पुलावर पाणी असल्यास पुल ओलडण्याचा प्रयत्न करू नये.

तसेच नदीचा प्रवाह चालू असताना नदीच्या किनारी किंवा धरणाच्या भिंतीलगत पावसामध्ये पर्यटन करू नये,  धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष अहमदनगर यांच्याशी त्वरित संपर्क करावा. असे आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
close