श्रीरामपूर। प्रतिनिधी:-
आयपीएल -१३ च्या सत्रात १५ व्या दिवशी प्रथमच दोन सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये पहिला सामना दुबईच्या वाळवंटात रखरखत्या उन्हात खेळविण्यात आला. यात राजस्थान रॉयल्स व आरसीबीचा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला आपल्या लौकीका प्रमाणे खेळ करता न आल्याने आरसीबी समोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. राजस्थानकडून महिपाल लोमरोर, जोस बटलर व रॉबीन उथप्पा यांनीच काय थोडीफार चांगली फलंदाजी केली.आरसीबीचा हुकुमी एक्का फिरकीपटू यजुवेंद्र चहलने आपल्या जादूई माऱ्याने आरसीबीच्या फलंदाजांना कोणतीही चाळचुळ करू न दिल्याने त्यांची धावसंख्या फारसी फुगलीच नाही.
परिणामतः मागील तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या आरसीबीचा कर्णधार कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या. त्याला नवोदित सलामीवीर देवदत्त पडीक्कलने आपल्या पहिल्याच आयपीएल सत्रातील तिसरे अर्धशतक ठोकून आपले अस्तित्व दाखवून दिले. कोहलीने या सामन्यात नाबाद ७२ धावा जरी काढल्या असल्या तरी त्याच्या ४ सामन्यात केवळ ९० धावाच झाल्या असल्याने त्याच्या फॉर्म व फलंदाजीवर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.
शनिवारी रात्री दिवसातला दुसरा सामना शारजात खेळविण्यात आला. या सामन्यात दिल्ली कपिटल्स व केकेआरची गाठ पडली. हा या सत्रातला एकूण सोळावा सामना ठरला. या छोटया मैदानातील मोठया धावसंख्येच्या सामन्यात दिल्लीने केकेआरवर १८ धावांचा विजय मिळवून गुणतालिकेत शिर्षष क्रम गाठला. प्रस्तुत लेखात आपण दिल्लीच्या विजयाच्या शिल्पकारांवर एक नजर टाकू या.
दिल्लीचा युवा कर्णधार श्रेयस अय्यरने या सत्रात फलंदाजीतील सातत्य राखता मात्र ३८ चेंडूत नाबाद ८८ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामध्ये त्याने ७ चौकार व ६ गगनभेदी षटकार खेचले.भारतीय क्रिकेटचे भवितव्य ठरू शकणाऱ्या पृथ्वी शॉनेही या सामन्यात जोरदार खेळ करताना ४१ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्यामध्ये त्याने प्रत्येकी चार चौकार व चार षटकारांचा मार केकेआरच्या गोलंदाजांना दिला. यादरम्यान त्याने शिखर धवनसह ५६ धावांची सलामी देत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली.
कर्णधार श्रेयस अय्यरसह तिसऱ्या गडयासाठी ७२ धावांची भागीदारी करताना यष्टीरक्षक रिषभ पंतनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत १७ चेंडूत ३८ धावा फटकविल्या. त्यामध्ये त्याने पाच चौकार व एक षटकार ठोकला.ऑनरिच नॉर्खिया या जलदगती गोलंदाजाने शारजाच्या छोटया व गोलंदाजांचे स्मशान असलेल्या खेळपट्टीवर आपल्या धारदार व नियंत्रीत गोलंदाजीने केकेआरच्या फलंदाजांची सत्वपरीक्षाच घेतली. स्वतःच्या ४ षटकांच्या हप्त्यात त्याने फक्त ३३ धावांचे मोल मोजून केकेआरचे सुनिल नारायण, ओएन मॉर्गन व पॅट कमिन्स हे महत्वाचे मोहरे टिपले.
तेराव्या आयपीएल सत्रात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या हर्षल पटेल या जलद गोलंदाजाने जोरदार मारा करताना सलग दोन चेंडूवर नितीश राणा व कर्णधार दिनेश कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवून दिल्लीच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

