shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिल्लीला सनरायझर्स विरुद्धचा पराभव भोवला...!!


श्रीरामपूर। प्रतिनिधी:
आयपीएल - १३ सत्राच्या ११ व्या सामन्यात अकराव्या दिवशी अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडीयमवर दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात एक सामना झाला. या सामन्यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अग्रस्थानी होता तर सनरायझर्स हैद्राबादच्या संघाने आपले दोन्ही सामने गमावल्याने गुणतालिकेत तळ गाठले होते. त्यामुळे या सामन्यात जर दिल्ली जिंकले असते तर त्यांची विजयाची हॅट्रीक झाली असती, आणि सनरायझर्स हरले असते तर त्यांची पराभवाची हॅट्रीक झाली असती. परंतु रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सनरायझर्सने सर्व क्रिकेट पंडिताचे अंदाज फोल ठरवत आपल्यापेक्षा मजबूत दिल्ली कॅपीटल्सला पराभवाची धूळ चारून गुणतालिकेत आपल्या नावे दोन विजयी गुणांची नोंद केली.  


या एका पराभवाने दिल्लीची अव्वल स्थानावरून घसरण झाली तर एका विजयाने सनरायझर्सची दोन स्थानांनी प्रगती झाली. दिल्लीसाठी या पराभवाबरोबर दुःखाची दुसरी बाब म्हणजे त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरला षटकांची गती योग्य न राखल्याने १२ लाख रूपयांचा दंड झाला.
सनरायझर्सने मागील दोन पराभवातून बोध घेत संघात अमूलाग्र बदल केले. या अंतर्गत माजी कर्णधार केन विल्यमसनला संघात घेतल्याने त्यांची फलंदाजी मजबूत झाली व अष्टपैलू काश्मिरी खेळाडू अब्दुल समदने संधी मिळताच चार चेंडूत एक चौकार व एक षटकार ठोकून १२ धावांच्या छोट्याशा खेळीतून आपल्या अस्तित्वाची झलक दाखविली.


हैद्राबादच्या पहिल्यावहिल्या विजयात चमकदार खेळ करणाऱ्या त्यांच्या जिगरबाज खेळाडूंची कामगिरी आपल्यासमोर थोडक्यात सादर करत आहोत.सामनावीर पुरस्कार मिळविलेला तरणाबांड फिरकी गोलंदाज राशिद खानने मागील दोन्ही सामन्यातील अपयश धुवून टाकत या सामन्यात जादुई गोलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवत सनरायझर्सला विजयाची चव चाखवली. राशिदने आपल्या चार षटकांच्या गोलंदाजीत मात्र चौदा धावा देताना शिखर धवन, श्रेयस अय्यर व रिषभ पंतला बाद करून दिल्लीच्या फलंदाजीचा कणाच मोडून टाकला. 

इंग्लिश सलामीवीर व यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बॅरिअस्टोने डावाच्या सुरुवातीला संकटांचा सामना करत स्वतःला सावरत संघाचा डाव उभा केला. सामन्यातील एकमेव अर्धशतक त्याने ठोकले. त्याने ४८ चेंडूत दोन चौकार व एक षटकार मारून ५३ धावा फटकविल्या. तो मैदानात उभा राहिल्याने दोन महत्वपूर्ण भागीदाऱ्या बनल्या. पहिल्या गडयासाठी वॉर्नरसोबत ७७ व विल्यमसन सोबत तिसऱ्या गडयासाठी ५२ धावा बनवून संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नर या सामन्यात चांगलाच रंगात होता. परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. तरीही त्याने तीन चौकार व दोन षटकार मारून केलेल्या ३३ चेंडूतील ४५ धावा संघासाठी फायदेशीर ठरल्या. शिवाय त्याने गोलंदाजीत केलेले बदल लाभदायक ठरले.अफाट गुणवत्ता व संघात खेळण्याची पात्रता असूनही नियमानुसार संघात चारच परदेशी खेळाडू खेळवायचे असल्याने पहिल्या दोन सामन्यात संघाबाहेर असलेला न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनने संधी मिळताच आपले महत्त्व सिद्ध करून दाखवत केवळ २६ चेंडूत पाच चौकारांसह ४१ धावा करत सनरायझर्सचा सुर्य मावळणार नाही याची दक्षता घेतली.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स कडून खेळताना पहिल्याच षटकात पृथ्वी (शॉ) ला सुरूंग लावला. त्यानंतर आणखी एक फलंदाज बाद करून दिल्लीवर . पराभवाची मोहोर ठोकली. भुवीने चार षटकात २५ धावात दोन बळी मिळविले.

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close