shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्लेन मॅक्सवेलवर लावलेले किंग्ज इलेव्हनचे पैसे वाया गेले ?


                       डाॅ. दत्ता विघावे

ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या सफेद चेंडूच्या खेळातील नियमीत खेळाडू. ऑस्ट्रेलियासाठी त्याने अनेक अविस्मरणीय डाव खेळाले असून ऑस्ट्रेलियाला अनेक विजयही मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु सन २०२० च्या युएईत होत असलेल्या आयपीएल सत्रात तो त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ अजिबात करताना दिसत नाही. त्यामुळे तो खेळत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मोठी गोची झाली असून त्यांनी खेळलेल्या सातपैकी सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला असून पंजाब संघ गुणतालिकेत अगदी तळाला गेला असून त्यांची प्लेऑफ फेरी गाठण्याची शक्यता यंदाही धुसर होत चालली आहे.

पंजाब कडून सलामीवीर व कर्णधार लोकेश राहुल व त्याचा दुसरा सलामीचा साथीदार मंयक अग्रवाल प्रत्येक आपल्या परिने संघासाठी भरीव योगदान प्रयत्न करतात व तसे त्यांनी दिलेही आहे. त्याचा सबळ पुरावा म्हणजे ७ पैकी ६ सामन्यात पराभूत झालेला हा संघ गुण तालिकेत शेवटच्या क्रमांकावर असला तरी त्यांचे दोनही सलामीवीर केएल राहुल व मयंक अग्रवाल हे स्पर्धेत सर्वाधिक धावा बनविणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मानाची ऑरेंज कॅप लोकेश राहुलच्या शिरावर विराजमान आहे. राहुल व अग्रवाल व्यतिरीक्त विंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने काही सामन्यात आपला जोर जरूर दाखविला परंतु त्यांच्या मधल्या फळीचे अपयश सर्वांचं लक्ष वेधून असताना सर्वाधिक महागडा दोन क्रमांकाचा परदेशी खेळाडू असलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटची बोथट झालेली धार पंजाबच्या पिछेहाटीचे कारण बनत चालली आहे.

किंग्ज इलेव्हनने ग्लेन मॅक्सवेलवर फार मोठी किंमत लावली असून तो त्याला दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या तुलनेत शुन्य टक्के खेळ करत आहे.पंजाब संघाने त्याला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले असल्याने त्याच्याकडून संघाच्या मोठया अपेक्षा असणे वाजवी असताना तो त्याच्या नैसर्गिक खेळाच्या अगदी उलट खेळ करत असून त्यामुळे पंजाबची मोठी फजिती होत असून केवळमधली फळी फेल जात असल्याने त्यांना हातातोंडाशी आलेले अनेक विजय गमवावे लागले आहेत. त्या प्रत्येक सामन्यात मॅक्सवेलने त्याच्या प्रतिमेच्या अनुरूप खेळ केला असता तर आज गुणतालीकेत पंजाब तळाला नाही तर अग्रक्रमावर आला असता.

आयपीएल १३ च्या सत्रात गडगंज रक्कम मिळालेल्या मॅक्सवेलने सात सामने खेळून केवळ ५८ धावा केल्या आहेत. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅक्सवेलच्या यामध्ये सर्वाधिक धावा आहेत मात्र तेरा,  व त्या त्याने बनविल्या १४.५०च्या सरासरी व ९५.०८ च्या स्ट्राईक रेटने. शिवाय यामध्ये त्याचे केवळ पाच चौकार सामील असून त्याच्या सारख्या तडाखेबाज फलंदाजाला एक सुध्दा षटकार मारता येऊ नये ही फार मोठी शोकांतीका बनली आहे. एवढे असूनही " निर्लज्जम सदा सुखी " या उक्तीप्रमाणे मॅक्सवेल त्याचे अपयश स्वतःस्विकारत नसून संघ प्रबंधनाच्या ढिसाळ कारभाराला दोष देत आहे.

सन २०१९ च्या सत्रात मानसिक स्वास्थ स्थिर नसल्यामुळे तो आयपीएल स्पर्धा खेळू शकला नाही. सन २०१४ चे आयपीएल सत्र भारतातील लोकसभा निवडणुकीमुळे पहिला टप्पा युएईत व दुसरा टप्पा भारतात खेळविण्यात आले. त्या सत्रात त्याने ५५२ धावा करून पंजाबला अंतिम फेरीत पोहचविले होते. तेथे कोलकाता नाईट रायडर्स कडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे त्याची मेहनत वाया गेली होती. सन २०१७ च्या सत्रात तर त्याला पंजाबने कर्णधारही बनविले होते. सन २०१८ मध्ये दिल्लीने त्याला खरेदी केले होते. परंतु तेथेही तो प्रभाव पाडू न शकल्याने दिल्लीने त्याच्यात कोणताही इंटरेस्ट न दाखविल्याने पुन्हा पंजाबने त्याला मोठी रक्कम देऊन खरेदी केले. परंतु पंजाबचे पैसे मात्र पाण्यात गेले असेच म्हणावे लागेल.

.लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close