तेराव्या आयपीएलच्या २६ व्या दिवशी दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. सात सामन्यानंतर १० गुण असलेल्या दुसऱ्या क्रमांकावरील दिल्ली कॅपिटल्सने सातव्या स्थानावरील राजस्थान रॉयल्सला अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात मात्र तेरा धावांनी लोळवून ८ सामन्यात १२ मिळवत गुणतालिकेत शिर्षस्थान मिळविले.
अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रिषभ पंत पाठोपाठ या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कर्णधार श्रेयस अय्यरही जखमी झाल्याने दिल्लीच्या अडचणी वाढल्या असताना श्रेयसऐवजी नेतृत्व करताना शिखर धवनने फलंदाजी करताना दाखविलेली तडफ कर्णधारपद सांभाळतानाही दाखविली. त्याने गोलंदाजीत केलेले बदल फलदायी ठरले. त्यामुळेच राजस्थानच्या रॉयल संघाला १३ धावांचा अपशकुनी पराभव पत्करावा लागला.
दिल्लीने या सामन्यात मराठमोळ्या जलदगती गोलंदाज तुषार देशपांडेला संधी दिली. त्यानेही पदार्पणातच नेत्रदिपक कामगिरी करताना संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. चला तर आपण दिल्लीला विजयी बनविण्यात पुढाकार घेतलेल्या मातब्बर खेळाडूंची कामगिरी आता आपण थोडक्यात जाणून घेऊ या.
सामन्याच्या सुुरुवातीलाच दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर अगोदर संयमी व नंतर आक्रमक खेळी करणाऱ्या सर्वात दिल्ली संंघतील सर्वात अनुभवी खेळाडू शिखर धवनने या सत्रातील सलग दुसरे अर्धशतक झळकविताना ३३ चेंडूत सहा चौकार व दोन षटकारांंनिशी ५७ धावा करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
कर्णधार श्रेयस अय्यरने नेहमी प्रमाणे जबाबदारीने खेळताना संघाची पडझड थांबविली व शिखर धवनसह मोलाची ८५ धावांची भागीदारी करत आणखी एक अर्धशतकी खेळी साकारली. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना तीन चौकार व दोन षटकारांसह ५३ धावा बनवून संघाला मजबूती मिळवून दिली.
ऑनरीच नॉर्खिया या द. आफ्रिकन वेगवान गोलंदाजाने पहिल्याच षटकात १६ धावा दिल्यानंतर उरलेल्या तीन षटकात जबरदस्त तेज मारा करताना राजस्थान संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडविताना प्रत्येक चेंडू ताशी प्रति १५० कि.मी पेक्षा अधिक वेगाने फेकले. त्यातील एक चेंडू तर १५६.५ कि.मी वेगाचा होता. नंतरच्या त्याच्या तीन षटकात १७ धावा सुध्दा मोठया मुश्किलीने बनल्या. त्याचा भन्नाट वेग जोस बटलर व रॉबीन उथाप्पाच्या दांडया कधी गुल करून गेल्या हे त्यांना कळलेच नाही.
आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या तुषार देशपांडेने जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला आपला पहिला बळी बनविताना श्रेयस गोपाळलाही सहज लाटले. अतिशय प्रभावी करताना केवळ ३७ धावा देत सर्वांचे मनं जिंकली व दिल्लीला सामनाही जिंकून दिला.
राजकारणाचा बळी ठरत चाललेला गुणवान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अतिशय चिवट व कंजुष गोलंदाजी करताना चार षटकात केवळ १७ धावा मोजल्या व स्टिव्हन स्मिथचा महत्वपूर्ण बळी घेऊन सामना दिल्लीकडे फिरविला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

