shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रवीचंद्रन आश्विनची आयपीएलमधील समस्त फलंदाजांना ताकीद...!!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :
आयपीएल -१३ च्या १७ व्या दिवशी १९ व्या सामन्यात सोमवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात दुबई येथे एक एकतर्फी सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने.आरसीबीला ५९ धावांनी हरवून मोठा विजय मिळविला व गुण गुणतालिकेत अग्रस्थान मिळविले. 
हे दोन्ही संघ या सत्रात झालेल्या दोन टाय सामन्यातील विजयी संघ असल्याने त्यांच्यातील सामना आणखीच मनोरंजक ठरण्याची प्रत्येकाची अपेक्षा होती. परंतु श्रेयस अय्यरच्या तरण्याबांड सहकाऱ्यांनी आरसीबीच्या अनुभवी संघाचा फज्जा उडविताना सहजरित्या विजय मिळविला.

दिल्लीच्या विजयात संपूर्ण संघाचाच पूर्ण वाटा असला तरी काही खेळाडूंनी इतरांपेक्षा वेगळा खेळ केल्याने त्यांचा उल्लेख येथे करणे अनिवार्य ठरते. फलंदाजीत पृथ्वी शॉ, मार्कस स्टोईनस, रिषभ पंत व गोलंदाजीत कागिसो रबाडा, ऑनरिच नॉर्खिया व अक्षर पटेलने जोर लाऊन कामगिरी बजावल्याने दिल्लीचे कार्य सुकर झाले.याच सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी केल्यानंतर आरसीबी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर त्यांच्या डावाचे तिसरे षटक फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विन टाकत होता. 

त्या षटकाच्या पाचव्या चेंडूचा सामना देवदत्त पडीक़्कल करत होता तर दुसरा सलामीवीर अरोन फिंच नॉन स्ट्राईकींग एंडला उभा होता. आश्विन चेंडू टाकायला पुढे येत असताना फिंच क्रिज सोडून बराच पुढे गेला होता. हे पाहून आश्विनने बॉल टाकला नाही व फिंचकडे बघत राहीला. वास्तविक आश्विन त्याला नियमानुसार मांकडींग पध्दतीने धावबाद करू शकत होता. परंतु त्याने त्याला बाद न करता ताकीद दिली. आश्विनच्या या निर्णयावर दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिगसह सर्व अवाक झाले.

स्पर्धेत खेळ भावना जपावी व कोणताही वादविवाद उत्पन्न होऊ नये या उद्देशाने दिल्ली संघ प्रबंधनाने या प्रकारे मांकडींग पद्धतीने नॉन स्ट्राईकिंग फलंदाजाला धावबाद न करण्याचा सद्भावनीक निर्णय घेतला.प्रत्यक्षात आश्विन नियमाचा कडक भोक्ता असल्याने त्याला हा निर्णय मान्य नसावा परंतु संघातील वरीष्ठांच्या म्हणण्याला मान देत त्याने या सामन्यात फिंचला केवळ चेतावनीवर सोडले, 

परंतु सामन्यानंतर आश्विनने आपल्या ट्वीटर अकौंंटवर स्पर्धेत सहभागी संघाना स्पष्टपणे सूचित केले की, या सत्रातील सर्व फलंदाजांना तो गोलंदाजी टाकत असताना ही पहिली व शेवटची ताकीद समजावी. यानंतर क्रिज सोडून पुढे जाण्याची चुक करणाऱ्या कोणत्याही फलंदाजाला ताकीद किंवा सूचना दिली जाणार नाही व त्याला माकंडींग पद्धतीने धावबाद केले जाईल. शिवाय हेे ट्वीट फलंदाज अरोन फिंच व या प्रकारे फलंदाजाला बाद करण्यास विरोध असलेल्या दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटींंगलाही टॅग केले आहे.

आपणास आठवत असेलच सन २०१९ च्या भारतात झालेल्या आयपीएल सत्रात आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करत असताना राजस्थान रॉयल्स विरूध्द खेळताना त्याने राजस्थानचा फलंदाज जोस बटलरला नियमाप्रमाणे मांकडींग धावबाद केले होते. त्यावेळी बटलर ६९ धावांवर खेळत होता व विजय राजस्थानच्या आवाक्यात होता. परंतु त्या घटनेनंतर राजस्थानचा डाव एकाएकी कोसळला व पंजाबने सामना जिंकला. 

या प्रकरणानंतर वाद चांगलाच चिघळला होता. नियमाप्रमाणे फलंदाज बाद असल्याने शक्यतो यावर वाद घालण्याची गरज नसतेच. गोलंदाजांचा पाय एक सेंटीमीटरही क्रिजच्या पुढे गेल्यास नो बॉल दिला जातो व फलंदाज सरळ नियम तोडून गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच जर धाव चोरण्यासाठी क्रिज सोडत असेल तर यात कुठली सद्भावना दाखवायची. कारण प्रत्येक जण येथे जिंकण्यासाठीच येतो. त्यामुळे आश्विनने जाहीर केलेले धोरण नियमाला धरूनच आहे. त्यामुळे खेळ भावनेचे खोटे टेंभे मिरविणाऱ्यांनी आकांड तांडव करण्याची कुठलीही गरज नाही. कारण क्रिकेट हा नियमाप्रमाणे चालणारा खेळ असून त्याला नियमाप्रमाणेच चालू दिले पाहीजे. शेवटी चुक करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहीजे. अखेर क्रिकेट हा अनेकांचा प्राणप्रिय खेळ आहे.
  लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close