सन २०२० हे वर्ष चित्रविचित्र घटनांनी कायम लक्षात राहील. कोरोना महामारी हे या वर्षाचं खास केंद्रबिंदू होतं. याच कोरोना व्हायरसमुळे बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लिग म्हणजेच आयपीएल भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी व शारजा येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचं विजेतेपद राखण्यात गतविजेते मुंबई यशस्वी ठरले.
विषम अंकी सालात विजेतेपद मिळविण्याची त्यांची परंपरा त्यांनी खंडीत करून सर्व विरोधी संघांना इशाराच देऊन टाकला की, त्यांना वर्ष सम अंकी असो वा विषम अंकी तसेच प्रथम फलंदाजी करणे असो वा धावांचा पाठलाग करत असो याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. मुंबई संघ व्यवस्थापन संघाची निवड, बांधणी करून खेळाडूंना कौटुंबिक आनंद देते. त्यामुळे खेळाडूही आपल्या कुवतीपेक्षा जास्त मेहनत करून संघाला विजयी करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतात.
मुंबई इंडियन्ससह सर्वच सहभागी संघ आपल्या संघात भरमसाठ पैसा खर्च करून नावाजलेले खेळाडू लिलावात खरेदी करतात. तर नवोदित खेळाडू कमी पैशातही उपलब्ध होतात. जास्त पैसे देऊन खरेदी केलेल्या खेळाडूंकडून संघ प्रबंधनाला मोठी अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. मग अशा परिस्थितीत संबंधीत खेळाडूकडून चांगली कामगिरी होणे गरजेचे असताना त्यांच्याकडून अतिशय भिकार खेळ होतो. त्यामुळे संबंधीत संघाच्या कामगिरीत घसरण होते व त्यांना पराभव तसेच स्पर्धेतून नामुष्कीजन्यरित्या बाहेर पडण्याची वेळ येते.
प्रस्तुत लेखात तेराव्या आयपीएल सत्रात मोठी रक्कम घेऊन खरेदी केलेल्या महागडया खेळाडूंच्या अपेक्षाभंग करणाऱ्या भिकारड्या कामगिरीवर एक दृष्टीक्षेप टाकू या.
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज व बऱ्यापैकी फलंदाजी करणारा पॅट कमिन्स आयसीसीच्या गोलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने त्याला १५.५ कोटी रुपयांना खरेदी केले. तोच या वर्षाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यामुळे संघाची त्याच्याकडून भारदस्त कामगिरीची अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. परंतु कमिन्स या सत्रात काही सामने वगळता सफशेल अपयशी ठरल्याने केकेआरला प्ले फेरी देखील गाठता आली नाही. कमिन्स या सत्रात १४ सामने खेळला. त्यामध्ये त्याने फलंदाजीत केवळ १४६ धावा काढल्या तर गोलंदाजीत मात्र १२ बळी तो मिळवू शकला. त्यामुळे केकेआरचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज व कामचलाऊ फिरकी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने १०.७५ कोटी रूपये देऊन आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. परंतु ग्लेन मॅक्सवेलने आपल्या ढिसाळ कामगिरीने पंजाब संघाला पूर्णपणे निराश केले. मॅक्सवेल या सत्रात १३ सामने खेळला, त्यामध्ये त्याची बॅट फारच निस्तेज ठरली. त्याला त्याच्या लौकीकाप्रमाणे फलंदाजी न करता आल्याने त्याच्या कडून एकही षटकार या स्पर्धेत दिसला नाही. त्याची फलंदाजीत १०८ धावा व गोलंदाजीत मात्र तीन बळी ही कामगिरी पंजाब संघाला प्ले ऑफ नेण्यास अपूरी पडली.
आस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथला राजस्थान रॉयल्सने १२.५ कोटी रूपये देऊन आपल्याकडे वळविले. कसोटीत सर्वोत्तम असलेला स्मिथ यंदाच्या आयपीएल सत्रात एकदम पोरगळ वाटला. त्याने १४ सामन्यात २६ च्या सरासरीने केवळ ३११ धावा काढून आरआरला साफ निराश केले. शिवाय कर्णधार म्हणून त्याचे अनेक निर्णय बुमरँग झाल्याने राजस्थानला प्ले ऑफच्या जवळ जाऊन दूरच राहावे लागले.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीसही नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या म्हणी प्रमाणे खाल्ल्या मिठाला जागला नाही. या सत्रात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने १० कोटींना विकत घेतले. मात्र त्याला या मोसमात दुखापतींनी फारच सतावले. मॉरीस एकूण नऊ सामने खेळला त्यामध्ये त्याला केवळ चौतीस धावा काढता आल्या तर ११ फलंदाजांनाच तो बाद करू शकला.
चेन्नई सुपर किंग्जने ७.८ कोटी रुपये देऊन खरेदी केलेला अष्टपैलू खेळाडू या सत्रात सफशेल अपयशी ठरल्याने चेन्नई संघाला आपली इभ्रत राखता आली नाही. पस्तीस वर्षीय केदार जाधवला आठ सामन्यात फक्त ६२ धावा काढता आल्या. यामध्ये त्याला लौकीकाप्रमाणे एक सुध्दा षटकार पाठविता आला नाही. या कामगिरीनंतर त्याचे आयपीएल करीअर संपल्यात जमा आहे.
तेराव्या आयपीएल सत्रात मुंबई इंडियन्सने आपले पाचवे विक्रमी विजेतेपद पटकविले. त्यामुळे या संघातील अपयशी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या नाथन कुल्टर नाईलने त्याला मिळालेल्या आठ कोटी रूपयांच्या तुलनेत फारच कमजोर कामगिरी केली. अंतिम सामन्यासह त्याला सात सामने खेळायला मिळाले पण बळी मात्र पाचच घेण्यात त्याला यश आले. त्याची ही ढिसाळ कामगिरी त्याचे पुढील सत्रातील मुंबई संघातील स्थान धोक्यात आणण्यास पुरेशी आहे.
वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरला दिल्ली कॅपिटल्सने ७.७५ कोटी रूपयांना खरेदी केले खरे, मात्र त्याने त्याचे मोल एखाद दुसरा अपवाद वगळता संघाला परत केले नाही. हेटमायर १२ सामने खेळला परंतु त्यात त्याला एकही अर्धशतक ठोकता न आल्याने त्याने केलेल्या धावांची संख्या १८५ धावांपर्यंतच मर्यादित राहीली.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

