क्रिकेट हा भारतात निव्वळ खेळ म्हणूनच ओळखला जात नाही तर या खेळाला भारतात धर्मापेक्षाही जास्त जवळचं मानलं जातं, तर ते खेळणाऱ्या खेळाडूंना देवाचा दर्जा दिला जातो. वास्तविक हे करणं योग्य का अयोग्य ? हा जरी वादाच प्रश्न असला तरी भारतीय लोकांना क्रिकेट खूप आवडतं. क्रिकेट भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तर जन्माने इंग्लिश असलेला हा खेळ भारतात इंग्लंडमध्येही नसेल इतका लोकप्रिय आहे. प्रत्यक्षात हा खेळ इंग्रज राजवटीत सुरू झाला आणि त्याच कालखंडात २५ जुन १९३२ भारत आपला पहिला अधिकृत कसोटी सामना थेट आपल्या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रंजाविरुध्दच क्रिकेटच्या मक्केत म्हणजे लॉर्डसवर खेळला. त्याचबरोबर भारत कसोटी खेळणारा सहावा देश बनला. त्यानंतर बरोबर ६१ वर्षांनी म्हणजे २५ जुन १९८३ रोजी एकदिवसीय सामन्यांच्या तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेचा विश्वकरंडक याच मैदानावर भारताने उंचावला व आपल्या अस्तित्वाची जाणीव समस्त क्रिकेट जगताला करून दिली.
या पहील्या विश्व विजेतेपदानंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाणारे अनेक दिवस उगवले. परंतु भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २० नोव्हेंबर या दिवसालाही अनन्यसाधारण महत्व आहे. चला तर बघू या नेमकं काय घडलं ते या २० नोव्हेंबर या दिवशी ?
भारतीय क्रिकेट मध्ये प्रत्येक एका खेळाडूने एक कालखंड गाजवला आहे. आपणाला आठवत असेलच सुनिल गावस्कर यांनी एक कालखंड गाजवला. त्यानंतर सचिन तेंडूलकरने तब्बल दोन तप जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. सचिनच्या सुर्यास्तानंतर कोहलीने विराट रूप धारण केल्याने सध्या समस्त क्रिकेट जगत व्यापून गेले. परंतु सुनिल गावस्कर यांच्या पूर्वी अनेक विक्रम कोणाच्या नावावर होते आजच्या पिढीतल्या बऱ्याच जणांना माहीती नाही.
सुनिल गावस्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शतके, द्विशतके ठोकून धावांचाही विश्वविक्रम स्वतःच्या नावे केला होता. परंतु भारताकडून पहिले द्विशतक सन १९५५ मध्ये झळकले तेही भारताने कसोटी खेळायला सुरुवात केल्यानंतर तब्बल २३ वर्षांनी, आणि ते द्विशतक फडकविण्याचा मान मिळविला तो पॉलीकाका नावाने ओळखले जाणाऱ्या पॉली उम्रीगर यांनी. तसेच तो ऐतिहासीक दिवस होता २० नोहेंबर १९५५ ! उम्रीगर यांनी न्युझिलंडविरूध्द ही अविस्मरणीय कामगिरी केली होती. पॉली काका त्या कालखंडात भारताचे विक्रमवीर म्हणून ओळखले जायचे.
२० नोव्हेंबर २००९ मध्ये भारताच्याच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधला सुवर्ण दिन उगवला व त्या दिवसाचा मानकरी होता विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर ! या दिवशी गुजरात मधील अहमदाबादच्या सरदार मोटेरा स्टेडियमवर सचिनने जगातल्या कोणत्याही फलंदाजाला न जमलेला महापराक्रम करून दाखविला. श्रीलंकेविरूध्दच्या त्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात शेवटच्या दिवशी सचिनने जेंव्हा पस्तासावी धाव घेतली तेंव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,०००(तीस हजार) धावा करणारा जगातला पहिला व आजवरचा एकमेव खेळाडू बनला. सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २०० कसोटीत १५९२१ धावा, ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा, तर एकमेव टि-२० सामन्यात १० अश्या सर्व मिळून ३४३५७ धावा काढून अद्वितीय पराक्रम केला आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

