शिर्डी: विनामास्क दंडात्मक कारवाई सुरु असताना मुंबई येथिल तिघांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की केली आहे. शहरात विनामास्क फिरणारे तसेच विषाणू साथरोग अनुषंगाने नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर शिर्डी नगरपंचायत आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू असून यात रुपये 100 असा दंड आकरला जात आहे. मात्र यावेळी बाचाबाची आणि धक्काबुक्कीची घटना समोर आली आहे.
आज (दि.12) सकाळी 11 वा. पिंपळवाडी चौक नगर-मनमाडरोड याठिकाणी विनामास्क दंडात्मक कारवाई सुरू असताना मुंबई विलेपार्ले येथिल तिघांना मास्क न वापरल्यानं साध्या वेशातील पोलिसांने जाब विचारला. संबधित इसमांनी उलट प्रश्न करून बाचाबाची सुरु केली. यावेळी गणवेशातील पोलिसांना बोलवण्यात आले. मात्र संबधीत इसम कुणाचे ही ऐकण्यास तयार नव्हते. आणि त्यानंतर पोलिस आणि तिन इसमात वाद होवून झटापट झाली.
पोलिसांची होणारी झटापट पाहून स्थानिक नागरिकांनी देखिल मध्यस्थिती करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर पोलिसांनी तिघा इसमांना गाडी बसवून शिर्डी पोलिस स्टेशन मध्ये नेले.
संबधित व्यक्ती साईभक्त आहेत यामुळे शिर्डीतील सचिन तांबे, गोपिनाथ गोंदकर, रविंद्र गोंदकर, दिपक वारुळे, दत्तू कोते यादींनी शिर्डी पोलिस स्टेशऩ मध्ये धाव घेतली. यावेळी पोलिसांनी तिघांची माहिती घेतली असता यातील एकावर हाफ मर्डर, तसेच दुस-यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले.
आपल्या बचावासाठी गावातील मंडळी आल्याचं लक्षात येताच संबंधित तिन इसमांनी पोलिस स्टेशन मधे देखिल आवाज चढवला. यावेळी उपस्थित सुज्ञ पदाधिका-यांन आपण चूकीच्या व्यक्तींसाठी आलो हे लक्षात आल्यानं पोलिसांना कारवाई करण्यास सांगून बाहेर पडले.
पोलिस कॉन्सटेबल किशोर अस्तिकराव औताडे यांच्या फिर्यादी वरून शिर्डी पोलिसांनी मरुगण सेल्व्राज देवेंद्र वय 33 वर्षे रा. विलेपार्ले, वेंकटेश सुब्रहमण्यम तेवर वय 27 वर्षे रा. माहिम, माशिला मनी मारुमुतु पिरायजी वय 34 रा. विलेपार्ले मुंबई यांच्यावर भादवि 353, 332, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक मिथून घुगे करत आहे.
गेल्या आठ महिन्यापासून साईबाबा मंदिर बंद असल्यानं येथिल आर्थिक घडी पुर्णपणे विस्कटली आहे. मंदिर जरी बंद असले तरी दिवसाकाठी हजार भाविक समाधी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत आहे. अलिकडे गर्दी होवू लागली असून येथिल व्यावसायिक आणि नागरिकांनी मास्क वापरणे महत्वाचं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर हा स्वतःसाठी आणि परिवारासाठी महत्वाचा आहे. कोरोना अटोक्यात राहीला तरचं लवकरात लवकर मंदिर खुले होवून साईनगरी पुर्वपथावर येईल हे शिर्डीकरांनी विसरता कामा नये.
दिवाळी सणात पोलिस आणि नगरप्रशासनानं दंडात्मक कारवाई शिथिल करुन वेगळ्या प्रकारची कारवाई सुरु करणं गरजेचे आहे. नागरिक सध्या आर्थिक अडचणीत असून ऐन सणात दंडात्मक कारवाई त्रास दायक ठरत असल्याचं नागरिकांकडून बोलल जात आहे.


