तेराव्या आयपीएल सत्रात सुरुवातीला भुवनेश्वर कुमार सारख्या महत्वाच्या खेळाडूचे अनफिट होऊन संघाबाहेर जाणे, संघाची घडी बसायला वेळ लागणे, पराभवाचा ससेमिरा पाठीमागे लागणे, एवी तेवी सर्व सुरळीत होतंय असे वाटत असताना विजय शंकरचे जखमी होणे, महत्वाचा परदेशी खेळाडू जॉनी बॅरिअस्टोच्या खेळात स्थिरता नसणे या गोष्टी मनाविरूध्द घडत असतानाही अस्ताला जाऊ पहाणारा सनरायझर्स हैद्राबादचा सुर्य पुन्हा एखादा शिरमाथ्यावर येऊन आयपीएल करंडक पटकावयच्या आशा पल्लवीत करू लागला आहे, आणि हे सर्व घडविण्यात अग्रेसर आहे तो एसआरएचचा जिगरबाज कर्णधार व ऑस्ट्रेलियाचा बिनधास्त खेळाडू डेव्हीड वॉर्नर !
स्पर्धेच्या उत्तरार्धात हैद्राबादसाठी प्रत्येक सामना जीवनमरणाचा झाला असताना वॉर्नरने ऑस्ट्रेलियन कु्टनिती वापरून प्रत्येक खेळाडूत वेगळीच सकारात्मकता ओतली. त्याचा परिणामही अगदी तसाच मधूर निघाला. शेवटच्या तीन साखळी सामन्यात हैद्राबादने तर कमालच केली. प्ले ऑफ साठी पात्र ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू व अव्वल स्थानावरील मुंबई इंडियन्सला हरवून आपले प्ले ऑफ मधील स्थान पक्के केले. संघाची पडझड सुरू होती तरीही हैद्राबादने आपली धावगती कधीही घसरू दिली नाही. याचा फायदा त्यांना अंतिम साखळी सामन्यापूर्वी १४ गुण घेऊन चौथ्या स्थानावर अधांतरी असलेल्या केकेआरला हटविण्यात झाला.
शेवटच्या साखळी सामन्यात हैद्राबादने कहरच केला. गुणतालिकेतील प्रथम क्रमांकाच्या मुंबई इंडियन्सला तर १० गडी राखून जोरदार धक्का देत आपले प्लेऑफचे रिझर्व्हेंशन कन्फर्म केले आणि तेही चौथ्या नव्हे तर तिसऱ्या क्रमांकाने. मुंबई विरूध्दचा हैद्राबादचा मोठा विजय काही लोक फ्ल्युक समजत असले तरी त्यात त्यांचे कसब व कौशल्य आहेच ना ?
मुंबईने त्यांच्या नियमीत संघात बदल करताना तंदुरुस्त होऊन परतलेला कर्णधार रोहीत शर्माला स्थान दिले तर प्रमुख खेळाडू हार्दीक पंडया, जसप्रित बुमराह व ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती दिली. टिकाकारांच्या म्हणण्यानुसार या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे हैद्राबादला मुंबईला हरविणे सुकर गेले. परंतु मुंबईने संघात बदल करणे हा त्यांचा अंतरीम विषय आहे. कोणाला खेळवायचे, कोणाला वगळायचे हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. यात हैद्राबादचा काहीएक संबंध नाही. शेवटी मुंबईनेही त्यांच्या जवळ उपलब्ध असलेला सर्वोत्तम संघ निवडला होताच ना ? त्या परिस्थितीचा फायदा हैद्राबादने उठविला यात कुठले नवल झाले ?
सन २०१६ च्या आयपीएल सत्राचे विजेतपद मिळविणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादची अवस्था त्या स्पर्धेतही यंदा सारखीच होती. त्यावेळीही शेवटच्या टप्प्यात सर्व सामने जिंकणे अनिवार्य असताना त्यांनी करामत करत प्ले ऑफचे तिकीट मिळविले व अंतिम सामन्यात संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगलुरूचे आव्हान थंड बासणात गुंडाळले व चमचमता आयपीएल करंडक पटकविला होता.
या सत्रात कर्णधार डेव्हीड वॉर्नरने फलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या क्षेत्रात शब्दशः आघाडीवर राहून संघाचा मोर्चा सांभाळला व इतर खेळाडूंपुढे आदर्श उभा करून चांगला खेळ करवून घेतला. हुकमी एक्का जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघात नसतानाही उपलब्ध गोलंदाजांचा योग्य उपयोग करून घेत वॉर्नरने संघाला विजेतेपदाच्या दरवाज्यात नेऊन ठेवले आहे. टि.नटराजन, संदीप शर्मा, शाहबाज नदीम व करामती फिरकी गोलंदाज राशिद खानने आपले कर्तव्य योग्य रित्या बजावून प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले तर वॉर्नर बरोबर प्रथमच सलामीला खेळत यष्टीरक्षक वृध्दीमान साहाने जॉनी बॅरिअस्टोची उणीव जराही जाणवू न देता स्वतःची वेगळी छाप सोडली व हैद्राबादच्या फलंदाजीला मजबूती दिली. मधल्या फळीत मनिष पांडे, अनुभवी केन विल्यमसन, विजय शंकर, नवोदित प्रियम गर्ग, अब्दुल समद व स्पर्धेच्या मध्यान्हाला संघात आलेला विंडीजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरने शानदार कामगिरी बजावल्याने गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर गटांगळ्या खाणाऱ्या हैद्राबादने थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत प्ले ऑफ मधील इतर संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.
प्ले ऑफ मध्ये एलिमिनेटर सामन्यात हैद्राबादची गाठ अस्थिर आरसीबीशी पडणार असून सध्याचा हैद्राबादचा खेळ व आत्मविश्वास बघता त्यांचेच पारडे जड ठरण्याची शक्यता असून हैद्राबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नर व त्याच्या चमूने यंदा चमत्कार घडविल्यास आश्चर्य मानू नये.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

