देवळाली प्रवरा - देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती साठी नगरपालिकेनेच खोडा घातला असल्याची बाब आप्पासाहेब ढुस यांनी मिळविलेल्या माहिती मध्ये उघड झाली आहे.
देवळाली प्रवरा येथील नगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या तसेच प्रवरा नदीच्या पट्ट्यातील ४८ गावातील वाढती गुन्हेगारी व त्यामुळे राहुरी पोलीस ठाण्यावर वाढणारा ताण लक्ष्यात घेऊन देवळाली प्रवरा गावात स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू केले आहे. सध्या देवळाली प्रवरा विविध कार्य सेवा सह सोसायटीच्या इमारती मध्ये भाडे तत्वावर केवळ चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर हे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. म्हणून या पोलीस ठाण्याची स्वतःच्या जागेत स्वतंत्र इमारत असावी आणि येथे पोलिसांचे संख्याबळ वाढून या परिसरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सण १९७९ पासून येथील जनता तसेच विविध संघटना प्रयत्नशील होते व आजही आहेत.
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यालया जवळ असलेली पोलीस ठाण्याच्या स्वमालकीच्या गट नंबर १६३२ मधील अर्धा एकर क्षेत्र महाराष्ट्र पोलीस खाते च्या नावावर आहे. तथापि देवळाली प्रवरा नगरपालिकेने सण २०१३ च्या विकास आराखडा मध्ये या जागेवर शॉपिंग सेंटर व पार्किंग तसेच म्युनिसिपल ऑफिस अँड शॉपिंग सेंटर असे आरक्षण टाकले आहे.
देवळाली प्रवरा येथे जरी नूतन पोलीस ठाणे मंजूर झाले तरी या जागेवर नगरपालिकेचे म्युनिसिपल ऑफिस, शॉपिंग सेंटर व पार्किंग चे आरक्षण असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे आरक्षण उठल्याशिवाय येथे नवीन पोलीस ठाणे इमारत बांधकाम करण्यास नगरपालिका बांधकाम परवानगी देऊ शकत नाही.
नगरपालिका हद्दीत कोणत्याही जागेवर विकास आराखड्यात जर एखादे आरक्षण पडले तर जवळपास २० वर्षे ते आरक्षण बदलत नाही. आणि जर ते आरक्षण हटवायचेच असेल तर आरक्षण लागू झालेपासून किमान दहा वर्षे तशी मागणी करता येत नाही. म्हणजे सण २०१३ पासून किमान दहा वर्षे मोजली तर सण २०२३ पर्यंत या जागेवर नगरपरिषदेचे हे आरक्षण असेच राहणार आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा येथे होणारे नवीन पोलीस ठाणेची बांधकाम बाबत कोणतीही प्रक्रिया २०२३ पर्यंत सुरू होऊ शकत नाही. म्हणून हे पोलीस ठाणे म्हणजे देवळाली प्रवरा च्या नागरिकांसाठी केवळ एक मृगजळ ठरले आहे.
त्यामुळे देवळाली प्रवरा येथील नूतन पोलीस स्टेशनला नगरपालिकेने विकास आराखड्यात म्युनिसिपल ऑफिस, शॉपिंग सेंटर व पार्किंग चे आरक्षण टाकून एकप्रकारे खोडाच घातला असल्याची प्रतिक्रिया आप्पासाहेब ढुस यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

