कोविड-१९ च्या कोपानंतर भारताचा संघ प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारत तीन एक दिवसीय सामने, तीन टि-२० व ४ कसोट्यांचा भरगच्च खेळ खेळणार आहे. या दौऱ्यात प्रथम वनडे मालिका खेळविली जाणार आहे. यातील पहिला सामना २७ नोव्हेंबरला सिडनीत होणार असून उर्वरीत दोन वनडे सामने २९ नोव्हेंबर व २ डिसेंबरला होणार आहेत.
ऑस्ट्रेलियातील भारताचा क्रिकेटच्या सर्वच प्रारूपांतील खेळ विशेष आनंद देणारा नाही. भारत ऑस्ट्रेलियात आतापर्यंत ५१ एकदिवसीय सामने खेळले असूून त्यातील ऑस्ट्रेलियाने ३६ तर भारताने १३ सामने जिंकले आहेत. सन १९८० पासून या दोन देशात १४० वनडे मॅचेस झाल्या असून यातील ७८ सामन्यात भारताचा पराभव झाला असल्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे भारताच्या तुलनेत फारच वरचे आहे. भारताचे ऑस्ट्रेलियात प्रदर्शन चांगले न होण्याचे कारण म्हणजे कागदोपत्री भक्कम असलेली भारताची फलंदाजी ऐन वेळी ढेपाळणे हे होय. तरीही भारताच्या काही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात जोरदार खेळ करून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत लेखात याच काही चमकदार खेळ करणाऱ्या फलंदाजांच्या अविस्मरणीय डावावर एक नजर टाकू या.
सन २०१६ च्या दौऱ्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताचा तडाखेबाज सलामीवीर रोहीत शर्माने कोणत्याही भारतीयाची ऑस्ट्रेलियातील वनडेमधील सर्वोत्तम खेळी साकारली. रोहीतने १६३ चेंडूंत शानदार नाबाद १७१ धावांची खेळी साकारली. त्यामध्ये त्याने १३ चौकार व ७ खणखणीत षटकार ठोकले होते. शिवाय विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी २०७ धावांची भागीदारी केली होती. तरीही स्टिव्हन स्मिथच्या १४९ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळविला.
सन २०१६ च्या त्याच दौऱ्यात कॅनबेरा येथील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा दुसरा सलामीवीर शिखर धवनने एका जोरदार शतकी खेळी केली. ११३ चेंडूंच्या त्या डावात धवनने १४ चौकार व २ षटकारांनिशी १२६ धावा बनविल्या. रोहीतच्या शतका प्रमाणेच शिखरचेही शतक वांझोटे ठरले व भारताने हा सामनाही २५ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाकडून यावेळेस त्यांचे सलामीवीर आरोन फिंच १०७ व डेव्हीड वॉर्नरने ९३ धावांचा पाऊस पाडला. त्याच धावांच्या पावसात भारताचे विजयाचे स्वप्नही वाहून गेले.
सन २०१६ च्या त्याच दौऱ्यात मेलबोर्नच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने ७ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ११७ धावा ठोकल्या. परंतु त्याचेही शतक करंटे सिध्द झाले व भारताला ऑस्ट्रेलियाने तिन गडी राखून हरविले.
सन २००४ च्या व्हीबी सिरीजच्या सिडनीत खेळलेल्या ७ व्या सामन्यात डावखुरा दणकेबाज फलंदाज युवराजसिंग व व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण यांच्यात चौथ्या गडयासाठी २१३ धावांची भागीदारी फुलली. त्या दरम्यान युवराजने १२२ चेंडू खेळताना १६ चौकार व दोन षटकारांसह १३९ धावा ठोकल्या तर लक्ष्मणनेही १३० चेंडूत नाबाद १०६ धावा काढल्या. भारताने जिंकलेल्या या सामन्यात युवराज़ सामनावीर ठरला.
सन २००८ च्या सीबी सिरीजच्या पहिल्या अंतिम सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सिडनीच्या मैदानावर १२० चेंडूत १० चौकारांसह नाबाद ११७ धावा काढल्या. त्याला त्या दरम्यान रोहीत शर्माने ८७ चेंडूत ६६ धावा काढून शानदार साथ दिली. या दोघांच्या जोरावर भारत सहा गडी राखून विजयी झाले होते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

