पिंपरी चिंचवड:-हिंजवडी आयटी-बीटी पार्कमुळे जमिनीला सोन्याचे मोल आल्याने पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकडचे भूमिपुत्र अक्षरशः मालामाल झाले आहेत. दुसरीकडे तळवडे आयटी पार्क लगत असलेल्या रुपीनगर, तळवडे, चिखली परिसर रेडझोनच्या गर्तेत अडकल्याने तिथे जमिनींचे मोल घसरल्याने काडिचाही फायदा झालेला नाही. रेडझोनमुळे ना विकास क्षेत्र असल्याने कुठल्याही बांधाकामाला परवानगी नसल्याने या भूमिपुत्रांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास वेगाने होत असल्याने येथील जमिनीचे मोल वाढले. शेतीपेक्षा कितीतरी पट पैसा जमिनीच्या विक्रीतून मिळतो म्हणून अनेकांनी शेती विकली. बहुसंख्य भूमिपुत्रांनी अनेक ठिकाणी प्लॉटिंग करून विक्रीतून पैसे कमावले. काही शेतकरी भागीदारीत बिल्डर (जेव्ही) झाले. विकास कामांची रेलचेल असल्याने पिंपळे सौदागर, वाकड भागात जमिनीला सर्वाधिक दर आहे. मोठ मोठे निवासी टॉवर्स, कॉम्पलेक्स, मॉल्स, मल्टिफ्लेक्स तसेच ब्रँन्डेड मालाची शोरुम्स याच भागत आल्याने व्यापारी गाळ्यांचे दर २० ते २५ हजार रुपये चौरस फुटावर आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने काही शेतकरी स्वतः बिल्डर झाले. काही शेतकरी पुत्रांनी काळाची पावले ओळखून सीबीसी स्कूल उघडले. प्रगतीचे वारू वेगात असल्याने शहराचा हा भाग सधन झाला.
दुसरीकडे २० वर्षापूर्वी देहूरोड दारुगोळा कोठाराच्या सिमाभिंती पासून तब्बल २००० यार्ड पर्यंतचे क्षेत्र ना विकास क्षेत्र जाहीर केल्याने रुपीनगर, तळवडे, चिखली परिसराचा विकास खुंटला. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी या झंजट मध्ये अडकायला नको म्हणून गुंठे गुंठे करुन क्षेत्र विकले. रेडझोन मध्ये जमीन असल्याने स्वतःचीच जमीन घाबरत घाबरत चोरून चोरून विकली. निगडी परिसरात गुंठ्याला ५०-६० लाख रुपये भाव असताना शेजारीच रेडझोन मध्ये २० लाख रुपये सुध्दा कोणी देत नव्हते. अखेर अवैध चाळी, पत्राशेड, दुकाने बांधून अनेकांनी हात मोकळे केले. किमान दोन हजार एकरावरचे क्षेत्र अशाच पध्दतीने मातीमोल झाल्याने शेतकरी, भूमिपुत्रांची कोंडी झाली. पिंपळे सौदागर, वाकडचे मूळ गावकरी करोडोपती झाले, पण तळवडे, रुपीनगरचे शेतकरी त्या तुलनेत कंगाल राहिले. केवळ रेडझोन मुळे हे नुकसान झाल्याची त्यांची भावना आहे.

