पुणे:-कचरा डेपोमधील पोकलेन खाली कोसळल्याने त्याच्या खाली येऊन कचरावेचक तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील कचरा डेपोत घडली आहे.
शाहबाज शेख ( वय २४, रा. हडपसर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोकलेन चालक रुपेश कुमार (वय २१, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी शाहबाज रामटेकडी इंडस्ट्रीज एरिया महानगरपालिका कचरा डेपोत कचरा वेचत होता. त्यावेळी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास रुपेश कचरा ढिगाऱ्यावर पोकलेन चालवित होता. रुपेशने उंच असलेल्या ढिगाऱ्यावर पोकलेन चढविल्यामुळे पोकलेन खाली पडला. त्यामुळे पोकलेनची बकेट लागून शाहबाज गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

