पुणे:-घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग घेणाऱ्या 31 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे शहरातील वानोरी हडपसर आणि कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसकोर्स येथे होणाऱ्या घोड्यांच्या शर्यती बंद आहेत. परंतु याठिकाणी सरावासाठी घोडे पळवले जातात. या घोड्यावर काहीजण घरातून बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून कोंढवा, हडपसर आणि वानवडी परिसरातील काही बुकींच्या घरावर एकाचवेळी सायंकाळी छापा टाकला.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले असून 31 जणांना अटक केली आहे. आरोपींच्या घरातून 31 मोबाईल, लॅपटॉप आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 3 लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

