shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडसह पुणेमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या !

पिंपरी चिंचवड:-अरबी समुद्रात बाष्पीभवनामुळे गारठा गायब होऊन उष्ण व दमट ढगाळ हवामानाच्या वातावरणामुळे नागरीक त्रस्त झाले होते. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये हलक्या सरी बरसत पावसाने हजेरी लावली.


अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीवरून जाणारे नोकरदार, बाजारपेठा उघडण्यासाठी आलेल दुकानदार, व्यापारी आणि फळे, भाजीविक्रेते यांची चांगलीच तारांबळ उडाली.

गत नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरूवातीला दक्षिणेकडील समुद्रामध्ये चक्रीवादळांची साखळी तयार झाली. एका पाठोपाठ आलेल्या ‘गती, निवार आणि बुरेवी’ चक्रीवादळांनंतर आता अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. तर अफगाणिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्चिमी चक्रावातमुळे हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. पंजाब हरियाणा, चंडीगड आणि दिल्ली राज्यातही पाऊस पडत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. जमीनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही भागात हवेत गारठा वाढला आहे. यातच उत्तरेकडून वाहणारे थंड आणि समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांचा संगम होऊन उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी (दि.12) सकाळपासूनच कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. सोमवारपर्यंत (दि.14) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही पावसाची शक्यता असून, मंगळवारपासून (दि.15) विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगाळ हवामान आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी काढणीला आलेलं पीक, द्राक्षे आणि भाजीपाला वाया जाण्याची भिती आहे.
close