शिर्डी एक्सप्रेस: इंदापूर प्रतिनिधी
या पुढे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, परिपोषण अनुदानासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांनासाठी राज्यातील सर्व संस्थाचालकांना बरोबर घेऊन भविष्यात काम करणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
दि. ४ रोजी इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. राज्य सल्लागार मानवेंद्र केंद्रे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण व संघटनेचे राज्य सल्लागार मानवेंद्र केंद्रे यांनी दि. ४ रोजी धावती सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान भिमाई आश्रमशाळेचे संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना जसा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो, याच धर्तीवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने आश्रमशाळा शिक्षकांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा. तो मिळावा यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले, रत्नाकर मखरे यांनी परिपोषण आहाराच्या प्रलंबित अनुदानासाठी तब्बल ८२ दिवस धरणे आंदोलन केले. त्यांचा हा संघर्ष मी वृत्तपत्रांमध्ये वाचला असे त्यांनी सांगितले.लोकशाही मार्गाने, प्रसंगी संघर्ष करुन आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्याकरता राज्याच्या संघटनेला मखरे यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.याकरिता त्यांनी संघटनेत यावे असे निमंत्रण चव्हाण यांनी यावेळी रत्नाकर मखरे यांना दिले.
यावेळी संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांनी पाहुण्यांचे आभार मानून पुढे म्हणाले की, माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच मुळात संघर्षातून केली आहे. शिव- फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार आणि आदर्श घेऊनच मी माझ्या संस्थेचा कारभार पाहत आहे. माझ्या संस्थेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना बहुजन महापुरुषांच्या विचार आणि आचाराचे धडे देण्याचे काम माझा शिक्षक वर्ग निरंतर करत असल्याचे मखरे यांनी सांगितले.
मखरे पुढे म्हणाले की, कोणत्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आले किंवा असले तरी आपल्याला VJNT आणि बहुजनांच्या प्रश्नांसाठी, न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठवावे लागतात. त्याशिवाय आपल्या पुढे काही पर्याय नसतो, त्यामुळे मी आणि माझा कर्मचारी संघर्षापासून कधीच मागे हटलेला नाही आणि भविष्यात हटणार नाही. महाराष्ट्रातील आश्रमशाळांना चांगले दिवस आणण्यासाठी, गतवैभव प्राप्त करण्यासाठी भविष्यात देखील आपल्याला प्रशासनाशी, सत्ताधाऱ्यांशी तथा सरकारशी लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागणार असल्याचे रत्नाकर मखरे यांनी सांगितले.
यावेळी सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

