shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मालिका विजयासाठी भारतास आपल्या काही चुका दुरूस्त कराव्याच लागतील..!!



                  ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या डे नाईट कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर मेलबोर्नला झालेल्या दुसऱ्या " बॉक्सिंग डे " कसोटीत भारताने पलटवार करत नेत्रदिपक यश मिळविले. या विजयानंतर भारतीय संघाचे जगभर कौतुक झाले. अनेक प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत मिळविलेला हा विजय खरोखर " स्पेशल " होता. या सामन्यात कर्णधार व फलंदाज म्हणूनही अजिंक्य राहणेने आपली विशेष छाप पाडली. त्यामुळे तो सर्वांचे आकर्षण ठरला. शेवटी विजय तो विजयच असतो. या अभूतपूर्व विजयामुळे पहिल्या कसोटीतील पराभवाने मलिन झालेली भारतीय संघाची प्रतिमा स्वच्छ होण्यास मदत झाली.

                   पहिल्या कसोटीतील पराभवास भारताची दुसऱ्या डावातील फलंदाजी जरी जबाबदार असली तरी त्या सामन्यात क्षेत्ररक्षकांची कामगिरी देखील त्यापेक्षा जास्त जबाबदार होती. त्या पराभवातून बोध घेतल्यामुळेच फलंदाज व क्षेत्ररक्षकांनी आपली कामगिरी उंचावली.  अगदी याच्या उलट कामगिरी ऑस्ट्रेलियन संघाची झाली त्यामुळे त्यांना हा पराभव बघावा लागला. फलंदाजीत दोन्ही डावात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले तर क्षेत्ररक्षकांनी तब्बल आठ झेल धरतीला दान केले. 
                    ऑस्ट्रेलिया संघाला मायदेशात झालेला हा पराभव चांगलाच बोचला असेल. आता पुढच्या कसोटीत ते बदला घेण्याच्या उद्देशाने उतरणार हे उघड असल्याने भारताला जर मालिका जिंकायची असेल तर खवळून उठणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजून प्रखर निर्धाराने सामोरे जावे लागेल.
                     भारताने बॉक्सिंग डे कसोटी मोठया दिमाखात जिंकली असली तरी संघात अजूनही काही कमकुवत दुवे आहेत की, जे दुरुस्त करणे गरजेचे आहे. भारताच्या याच कमकुवत दुव्यांवर प्रस्तुत लेखात आपण चर्चा करणार आहोत.
                      सन २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने कांगारूंना २-१ अशी धुळ चारत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. त्या मालिका विजयात प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने ५२१ धावा केल्या होत्या. मात्र तोच पुजारा गेल्या १७ कसोटी डावात शतक करण्यात अपयशी ठरला असून या दौऱ्यातील चार डावात ४३, ०, १७, व ३ असा अपयशी ठरला आहे. पुजाराने स्वतःच्या कामगिरी वेळीच सुधारणा न केल्यास भारताला त्रासदायक ठरू शकते शिवाय पुजाराला आपले संघातील स्थानही गमावावे लागू शकते. 
                       एक सलामीवीर म्हणून समाधानकारक कामगिरी असली तरी मागच्या दोन कसोटीतील अपयशाने पुढच्या कसोटीत मयंक अग्रवालचे संघातील स्थान धोक्यात आले असून मागील चार डावातील १७, ९, ० व ५ अशी कमजोर कामगिरी त्याला संघातील स्थान रोहीत शर्मासाठी खाली करण्यास भाग पाडणार आहे. तरीही मयंकने झालेल्या चुकांतून शिकले तर तो पुन्हा अंतिम अकरा जणात स्थान मिळवू शकतो.
                     सन २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात करणारा प्रतिभावान व तंत्रशुद्ध फलंदाज हनुमान विहारी आतापर्यंत कसोटीत १ ते ६ क्रमांकावर खेळला असून त्याची मागील कामगिरी बऱ्यापैकी असली तरी या दौऱ्यात त्याने खेळलेल्या ३ डावात १६, ८ व २१ अशा ४५ धावाच करू शकला. त्यामुळे हा संंकटमोचक हनुमान स्वतःच संकटात सापडला असून त्यालाही स्थिर झाल्यावर मोठी खेळी करण्याचे आपले तंत्र विकसित करावे लागेल अन्यथा संंघाबाहेर असलेला के. एल. राहुल त्याची जागा घेऊ शकतो.
                      भारतीय गोलंदाजीचा ताफा आज या घडीला जगातील सर्वोत्तम मानला जातो. भारतीय गोलंदाज विरोधी संघाचे बिनीचे फलंदाज झटपट बाद करतात परंतु तळाकडच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात त्यांना सातत्याने अपयश येत आहे. भारतीय गोलंदाजांचे हे प्रमुख दुखणे असून या दौऱ्यातील दोन कसोटयात ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. भारताने पहिली कसोटी गमावण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. हीच गत दुसऱ्या कसोटीत झाली.  ऑस्ट्रेलियाचे शेपूट दुसऱ्या डावात जास्तच वळवळले त्यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
                      वरील सर्व बाबींवर भारताने तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे. नाहीतर मालिका विजयाचा हाती आलेला सोन्यासारखा घास गमावण्याची वेळ येऊ शकते.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close