4 लाख 40 हजाराहून अधिक बालकांना देणार पोलिओ लस..!!
अहमदनगर: जिल्ह्यात रविवार दिनांक 31 जानेवारी,2021 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणाकरीता अहमदनगर जिल्हयामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामिण भागात 3 लाख 77 हजार 358 शहरी भागात 16 हजार 669 व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 46 हजार 260 असे जिल्हयामध्ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी ग्रामीण भागात 3 हजार 521 बुथ, शहरी भागात 87 व महानगरपालिका क्षेत्रात 374 असे एकूण जिल्हयामध्ये 3 हजार 982 बुथवर एकूण 9 हजार 110 कर्मचा-यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. राज्यस्तरावरुन अहमदनगर जिल्हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली आहे.
नागरिकांनी या मोहिमेमध्ये आपल्या 0 ते 5 वर्षे वयाच्या बालकांना यापुर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पुन्हा पोलिओ डोस घेऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 100 टक्के यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य व शिक्षण समिती प्रताप शेळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात येते. गेली 25 वर्षे सातत्याने पोलिओ निर्मुलनाकरीता ही मोहिम राबविली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून सन 13 फ़ेब्रुवारी 2011 नंतर भारतामध्ये एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही व भारताला पोलिओ मुक्त झालेचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये देण्यात आले आहे.
ही लसीकरण मोहिम दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. दिनांक 01 फ़ेब्रुवारी 2021 रोजी तांत्रीक खंड घेऊन ग्रामिण भागात 02 फ़ेब्रुवारी 2021 पासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून राहिलेल्या लाभार्थ्यांना शोधून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हयात 103 ट्रांझिट टीमव्दारे बस स्टँड, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व 131 मोबाईल टिमव्दारे ऊसतोड कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजूरी करणा-या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र/ ग्रामिण रुग्णालये/ नगरपालिका दवाखाने व महानगर पालिका येथील सर्व वैदयकिय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी सहभाग नोंदवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.*

