नेवासा: नेवासा येथील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या साई शिवार प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा तालुक्यातील जडणघडणीत योगदान देणाऱ्या जेष्ठ पत्रकारांचा श्री साई चरित्रकार कै.गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत यांच्या नावाने”पत्रकार रत्न” मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे यांनी दिली.
नेवासा तालुक्याच्या उत्कर्षासाठी व जडणघडणीत लेखणीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर या पत्रकारांनी आवाज उठविला होता त्यांच्या या कार्याची उतराई होण्यासाठी हा उपक्रम साईशिवार प्रतिष्ठानने हाती घेतलेला आहे.
नेवासा येथील जेष्ठ पत्रकार रामभाऊ पठाडे,मधुकरराव देशपांडे,बाळासाहेब तनपुरे,विजय भंडारी,भाऊसाहेब पाठक सर,सोनईचे जेष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले, चांदा येथील नीलकंठ चौरे या पत्रकारांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.
दि.28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नेवासा येथे श्रीराम मंदिर सभागृहात जेष्ठ पत्रकारांना गौरविण्यात येणार आहे.श्रीराम मंदिरातील प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.
साईबाबांनी नेवासा शिवारात अनेक महिने वास्तव्य करून कार्य केले आहे त्यांच्या येथील कार्याची ओळख समाजाला व्हावी म्हणून साईबाबा यांनी सुरू केलेल्या अन्नदान या उपक्रमाचा शुभारंभ देखील यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
नेवासा तालुक्यात वरील पत्रकारांनी सडेतोड लिखाण करून तालुक्यातील समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या कार्याची उतराई होण्यासाठी पत्रकार रत्न हे मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्याचा हा छोटासा प्रयत्न साई शिवार प्रतिष्ठान करत असून या निमित्ताने नेवासा शहरासाठी योगदान देत असलेल्या नगरसेवक व नगरसेविका यांना साईबाबांचे सेवक बाळाजी पाटील नेवासकर यांच्या नावाने समाजरत्न मानपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार असून व्यापारी जयकुमार गुगळे यांच्या वतीने साईभंडारा कार्यक्रमाचा पहिल्या महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे यांनी सांगितले.


