-वडार समाज आहे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत ...!
खर्डा(जामखेड)प्रतिनिधी(श्रीमंत लष्कर):
स्वातंत्र्यप्राप्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. अनेक चळवळी,लढे उभारले गेले,अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली पण राज्यकर्त्याच्या दुर्लक्षपणा मूळे वडार समाजाची अवस्था चिंतनीय राहिली आहे.
शैक्षणिकतेचा अभाव, शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. अशिक्षित, अंधश्रद्धाळू, आर्थिक विवंचनेत असणारा हा दुदैवी वडार समाज ५० वर्ष मागे राहिलेला आहे.
ज्या वडार समाजाने भारताच्या विकासातील जडणघडणीसाठी अनमोल असे योगदान दिले आहे.अशा समाजाचा राजकिय नेत्यांना माञ विसर पडल्याचे दिसते आहे हिच खरी शोकांतिका आहे.
पूर्वीपासून शेतीसाठी सिंचनासाठीचे साधने निर्माण करणारा उदा. विहिरी खोदणे, धरणाची निर्मिती,तलाव, पाट,चारी खोदणे यासह देशातील महत्वाचे रस्ते, रेल्वेलाईन, बोगदे खणून रस्ते बनविणे,वाडे, बुरूज,गढ,किल्ले बांधणे,रूचकर जेवणासाठी पाटा-वरवंटा तयार करणे, दगडी पूल, इमारती,मंदिरे बांधणाऱ्या व साक्षात देवालाही मुर्ती स्वरूपात घडवणारा वडार समाज अजून ही रस्त्यावर खडी फोडत आहे. याला काय म्हणावे...?
स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही वडार समाजातील, स्त्री, पुरुष व लहान मुलांना ही एक जन्मठेपेची शिक्षाच देण्यात आली असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.
तरी या वडार समाजाचा राज्यकर्त्यांनी सकारात्मक विचार करून या समाजाला योग्य असा न्याय देऊन मुख्य प्रवाहातआणण्यासाठी प्रयत्न करावे हीच या लेखानिमित्त अपेक्षा..!

